शेतकऱ्यांचा योद्धा प्रा. शरद पाटील

By Admin | Updated: November 20, 2014 01:09 IST2014-11-20T01:09:43+5:302014-11-20T01:09:43+5:30

शरद जोशींचे घराणे, जात, पैसा, पार्श्वभूमी या सगळ्या बाबी संपूर्णपणे प्रतिकूल असताना त्यांनी शेतकऱ्यांची अभूतपूर्व एकी घडवून आणली. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्वित्झर्लंडसारख्या देशातली एषोरामी

Farmer's Warrior Pvt. Sharad Patil | शेतकऱ्यांचा योद्धा प्रा. शरद पाटील

शेतकऱ्यांचा योद्धा प्रा. शरद पाटील

शरद जोशींचे घराणे, जात, पैसा, पार्श्वभूमी या सगळ्या बाबी संपूर्णपणे प्रतिकूल असताना त्यांनी शेतकऱ्यांची अभूतपूर्व एकी घडवून आणली. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्वित्झर्लंडसारख्या देशातली एषोरामी नोकरी सोडून ते शेतकऱ्यांची संघटना बांधायला भारतात आले. तेव्हा या बामणाच्या पोराला शेतीतले काय कळते म्हणून त्यांची हेटाळणी झाली. सुरुवातीला हा चक्रम माणूस आपल्या गावात आला असे म्हणून दूर पळणारे शेतकरी हळूहळू त्यांच्या जवळ यायला लागले. शेतीचा व्यवसाय तोट्यात का आहे? याचे त्यांनी केलेले विश्लेषण त्यांच्या मनाला भिडले. पाहता-पाहता शेतकरी संघटना उभी झाली आणि या संघटनेने शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळविले.
नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी १९८० मध्ये एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांची युनोमधील नोकरी, त्यांची विद्वत्ता, शेतकऱ्यांविषयीची कळकळ, सहज, सोप्या भाषेत संवाद साधण्याची हातोटी या गुणांमुळे त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाले. शेतीच्या प्रश्नांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेली संघटनेची विचारधारा एक नवीन दिशा देणारी ठरली. स्वत: शेतीवर अवलंबून नसूनही आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा माणूस फार मोठा त्याग करून भारतात आला, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना होती. लोक शरद जोशी आणि संघटनेवर फिदा झाले. कांदा आंदोलनानंतर संघटना इतकी बलशाली झाली की, तिच्या नावाने सत्ताधाऱ्यांना धडकी भरत होती. राजकारणात मुरलेल्या सत्ताधाऱ्यांना या संघटनेने सळो की पळो करून सोडले. अनेक शेतकऱ्यांनी शरद जोशींचे छायाचित्र देव्हाऱ्यात ठेवून त्यांची पूजाच मांडली, हे मी स्वत: अनुभवले आहे.
त्या काळात देशातील शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहात होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर ते दिवस अक्षरश: मंतरलेले होते. शरद जोशींच्या सभांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. असंख्य प्रामाणिक आणि नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची फैज त्यांच्या मागे उभी झाली. संघटनेच्या सभांना तीन-चार लाखांची गर्दी साधारण बाब झाली. संघटनेचा बिल्ला छातीवर लावलेला कार्यकर्ता एखाद्या विजयी विराच्या तोऱ्यात वावरायचा. सर्वसामान्य शेतकऱ्यांनासुद्धा संघटनेने जो आत्मविश्वास आणि आत्मस्नमान दिला त्याला शेतकरी चळवळीच्या इतिहासात तोड नाही. राजकारणी लोकांना ही नवीनच डोकेदुखी सुरू झाली. हा झंझावात कसा आवरावा, हे त्यांना कळेना. जातीयवादाचे त्यांचे हुकुमी शस्त्र बोथट झाले. कारण हे बामनाचे पोर शेतकऱ्यांना आपल्या रक्ताच्या पुढाऱ्यांपेक्षाही जास्त जवळचे वाटायला लागले होते.
शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं. शेतीच्या शोषणाचं मूळ सरकारी धोरणात आहे हा अर्थशास्त्रीय विचार त्यांनी इतक्या प्रभावीपणे आणि इतक्या सोप्या भाषेत मांडला की, संघटनेचे अडाणी कार्यकर्तेसुद्धा मोठमोठ्या विद्वानांशी विवाद घालून त्यांना निरुत्तर करायला शिकले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतमालाच्या भावाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय निर्विवादपणे त्यांचेच आहे. त्यांच्या एका हाकेवर लाखो शेतकरी जमायचे कारण ते खरोखरीच शेतकऱ्यांचे पंचप्राण होते. अनेक लोक समजतात त्याप्रमाणे शेतमालाला भाव हा काही शरद जोशींचा एककलमी कार्यक्रम नव्हता. ग्रामीण जीवनात समग्र क्रांती आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. शेतीत कष्ट करणाऱ्या स्त्रिया असोत वा शोतमजूर सगळ्याच कष्टकऱ्यांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचा लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता. शेतकऱ्यांनी शेतीतला वाटा आपल्या पत्नीच्या नावे करून द्यावा या त्यांच्या आग्रहाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शेतमालाला भाव मिळूनही शेतमजुरांची मजुरी वाढली नाही तर मी स्वत: शेतकऱ्यांच्या विरोधात चळवळ उभी करीन.
(लेखक शेतकरी संघटनेच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)
मारवाडी फाऊंडेशनचा यंदाचा समाज प्रबोधन पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना देण्यात येत आहे. वयाच्या पंचविशीत असलेल्या युवा पिढीला कदाचित या शेतकरी योद्ध्याची पुरेशी ओळख नसावी. पण ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली असेल त्यांना शरद जोशींनी ८०च्या दशकात एकहाती निर्माण केलेल्या शेतकरी संघटनेच्या झंजावाताचा विसर पडणे शक्य नाही. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरद जोशी यांना स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शरद जोशी यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध.

Web Title: Farmer's Warrior Pvt. Sharad Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.