विदर्भातील शेतकर्यांचा हरितगृह उभारणीवर भर!
By Admin | Updated: August 17, 2014 00:16 IST2014-08-16T23:13:35+5:302014-08-17T00:16:51+5:30
साकोली कृषी विज्ञान केंद्र व एमएफकेव्ही देणार शेतकर्यांना देणार प्रशिक्षण.

विदर्भातील शेतकर्यांचा हरितगृह उभारणीवर भर!
अकोला : संरक्षित शेती या संकल्पनेला विदर्भातील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता विदर्भातील शेतकरी मोठय़ा संख्येने हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत आहेत. शेतकर्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील कृषी विज्ञान कें द्र व राहुली येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हरितगृहामध्ये तापमान, आद्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न, पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक, पिकांच्या अवस्थेनुसार कमी अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कर्बाम्ल इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न, उघड्या शेतापेक्षा बरेच जास्त उत्पादन घेतले जाते.
नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉलीहाऊसचा वापर केला जातो. पॉलीहाऊसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येते आणि मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळवारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर परिणामकारक उपाययोजना करता येतात.
या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पादनात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने, या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. आता तर विदर्भातील शेतकर्यांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह, हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फुलशेती, भाजीपाला लागवड, तसेच हरितगृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदीचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.
कृषी विज्ञानकेंद्र, साकोली येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी नवीन तंत्रज्ञानामुळे बिगरमोसमी उत्पादन घेता येत असल्याचे सांगुन त्यातुन मिळणार्या उत्पादनांना चांगले दर मिळत असून संशोधन, दुर्मीळ वनस्पतीचे संगोपन, तसेच बीजनिर्मीती व रोपनिर्मितीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे सांगीतले. येत्या २0 व २१ ऑगस्ट रोजी साकोली येथे शेतकर्यांना दोन दिवस तंत्रज्ञान अवगत करू न दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.