गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांसह शेतातील सुपीक मातीही पुरासोबत वाहून गेली आहे. तसेच दुभती जनावरे, शेळ्या मेंढ्याही पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या आहेत. घरादारात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी शेतकरी आणि सर्वसामन्यांचे खाण्या पिण्याचेही हाल होत आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत.
या संदर्भात सोशल मीडिावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांनी लिहिले की, राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू इच्छितो.
१- पंचनामा प्रक्रीयेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.
२- नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे - वस्तुत: आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा. - वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी व पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे. - शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे.
३- साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात.४-शेतकरी हिताचे निर्णय - पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे.- वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.५ - मानसिक व सामाजिक आधार.- आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे. ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, याचा मला विश्वास आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
Web Summary : Sharad Pawar urges government action after heavy rains devastated Maharashtra, impacting farmers and rural economies. He requests swift compensation, infrastructure revival, and debt relief. Prioritizing farmer welfare and mental health support is crucial amidst the crisis.
Web Summary : शरद पवार ने महाराष्ट्र में भारी बारिश से किसानों और ग्रामीण अर्थव्यवस्थाओं पर हुए विनाशकारी प्रभाव के बाद सरकार से कार्रवाई का आग्रह किया। उन्होंने तत्काल मुआवजे, बुनियादी ढांचे के पुनरुद्धार और ऋण राहत का अनुरोध किया। संकट के बीच किसान कल्याण और मानसिक स्वास्थ्य सहायता को प्राथमिकता देना महत्वपूर्ण है।