शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
By Admin | Updated: July 28, 2016 20:49 IST2016-07-28T20:49:35+5:302016-07-28T20:49:35+5:30
अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्रावरच पीक विमा रक्कम भरून घेतली जात होती. मात्र, गुरुवारपासून ७/१२ व ८-अचीही मागणी होऊ लागली.

शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
ऑनलाईन लोकमत
चौसाळा (ता. बीड) : अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्रावरच पीक विमा रक्कम भरून घेतली जात होती. मात्र, गुरुवारपासून ७/१२ व ८-अचीही मागणी होऊ लागली. त्यामुळे आडवणूक होत असल्याचा आरोप करुन संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. गुरुवारी बँकेचा कारभार सुरूळीत होताच विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यापूर्वी पीक पेरा प्रमाणपत्रावर विमा भरला जात होता. आता नव्यानेच सात/बाराची मागणी होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत होते. शेतकऱ्यांचे हाल पाहता पीक पेऱ्यावरच विमा भरून घेण्याची मागणी शिवसेनेचे पं.स. सदस्य विलास महाराज शिंदे यांनी केली होती; मात्र अधिकाऱ्यांची अरेरावी वाढत असताना संतप्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी येथील शाखेला कुलूप ठोकले. शिपायांसह अधिकारी, कर्मचारी कुलूपबंद शाखेतच अडकून राहिले होते.
दुपारी दोनच्या सुमारास ठोकलेले टाळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत उघडण्यात आले नव्हते. पीक विमा भरण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्यानंतरच टाळे उघडणार असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी चंद्रसेन गुंजाळ, पी.डी. मुंडे, बापू भांड आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हुलकावणी देत कर्मचारी मागच्या दरवाजाचे बाहेर पडले.