व्हिडिओ क्लिप बनवत शेतकरी पुत्राने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 16:58 IST2021-11-20T11:00:31+5:302021-11-20T16:58:10+5:30
Farmer's son commits suicide by making video clip : फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ क्लिप मध्ये म्हटले आहे.

व्हिडिओ क्लिप बनवत शेतकरी पुत्राने केली आत्महत्या
मूर्तिजापूर (जि. अकोला): तालुक्यातील ग्राम साखरी येथील युवा शेतकरी व शेतकरी पुत्र प्रवीण बाबूलाल पोळकट (३२) याने १८ नोव्हेंबर रोजी विष प्राशन केले. दरम्यान उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले मात्र १९ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
साखरी येथील रहिवासी प्रवीण पोळकट यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ क्लिप प्रसारीत केली असून सदर क्लिप मध्ये माझ्या कडे जिल्हा बँकेचे व एका खासगी फायनान्सचे कर्ज असल्याने मी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे, प्रवीण यांचे वडील कॅन्सरग्रस्त असून त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे, हिच शेती गहान ठेवून महिंद्रा कोटक फायनान्स कंपनी कडून प्रवीण यांनी ट्रॅक्टर खरेदी केला होता, सतत होत असलेल्या नापिकीमुळे ट्रॅक्टरचे हप्ते थकले असल्याने कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर ओढून नेला. सदर ट्रॅक्टर कंपनीने ओढून नेल्याने प्रवीण यांना तो अपमान सहन झाला नाही. यामुळे या फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ क्लिप मध्ये म्हटले आहे.