"बाप राबतो म्हणून अन्न मिळतं; काही वाचाळवीर त्याचीच चेष्टा करताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 07:52 AM2020-12-23T07:52:03+5:302020-12-23T07:52:32+5:30

शेतकरी नेते अजित नवले यांचं पंतप्रधान मोदींवर जोरदार शरसंधान

farmer leader ajit nawale slams pm narendra modi over new farm laws | "बाप राबतो म्हणून अन्न मिळतं; काही वाचाळवीर त्याचीच चेष्टा करताहेत"

"बाप राबतो म्हणून अन्न मिळतं; काही वाचाळवीर त्याचीच चेष्टा करताहेत"

googlenewsNext

नाशिक: फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील वाचाळवीर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं सांगत आहेत. पण मग त्यांना दिल्लीत सुरू असलेले आंदोलन दिसत नाही का, असा सवाल शेतकरी नेते अजित नवले यांनी उपस्थित केला. वर खोटारडा माणूस बसला आहे, हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं, अशा शब्दांत नवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. ते काल शिरपूरमध्ये झालेल्या किसान सभेच्या मोर्चात बोलत होते.

नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत नवलेंनी सोशल मीडियावर कायद्यांची भलामण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं. 'बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याच बापाची चेष्टा करत आहात. ज्यांना बटाटा कुठे येतो माहिती नाही, ते आम्हाला शेतीचं अर्थकारण सांगत आहेत,' असा खोचक टोला नवले यांनी लगावला.

नवले यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवरचा जोरदार समाचार घेतला. आमचा माल कुठे विकायचा हे आम्ही पाहू. तुम्ही हे सांगणारे कोण? कृषी कायद्यानुसार एखादा करार झाल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे बुडवले तर शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. ज्याचं डोकं स्वत:च्या खांद्यावर आहे, त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, असं नवले म्हणाले.

पंतप्रधान मोदींवरही निशाणा
वर खोटारडा माणूस बसला आहे हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं. आपण शेतात काय लावलं पाहिजे ते मूठभर लोक सांगणार. कडाक्याच्या थंडीत शेतकरी दिल्लीत बसला आहे. दिल्लीतीत शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असं अजित नवले यांनी म्हटलं.

'मोदींच्या कार्यकाळात फक्त पाच टक्के लोकांचा विकास'
देशातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी आहेत. या देशात फक्त पाच टक्के लोकांचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. सर्वठिकाणी कंत्राटी पद्धत आली आहे. शेतकरी संकटात आला तर संपूर्ण समाज संकटात येईल, असा इशारा किसान सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिला.

Web Title: farmer leader ajit nawale slams pm narendra modi over new farm laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.