सोशल मीडियावरील रेड सॉईल स्टोरीज या आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक जीवन आणि कोकणातील खाद्यसंस्कृतीची ओखळ करून देणारे प्रसिद्ध युट्युबर शिरीष गवस यांचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि आई, वडील, बहीण असा परिवार आहे. शिरीश गवस आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांचा कोकणातील पारंपरिक जीवनशैली विविध पदार्थांची ओळख जगासमोर आणणारा रेड सॉईल स्टोरीज हा युट्युब चॅलेन अल्पावधीत प्रसिद्धीस आला होता.
उच्चशिक्षित असलेले शिरीश गवस आणि त्यांची पत्नी पूजा यांनी कोरोनाकाळामध्ये मुंबईतील नोकरी सोडून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटये गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोकणातील पारंपरिक जीवन जगत असतानाच ही जीवनशैली त्यांनी युट्युब चॅनेलच्या माध्यमातून जगासमोर आणली.
रेड सॉईल स्टोरीज या चॅनेलमधून गवस दाम्पत्य कोकणाती पारंपरिक जीवन आणि खाद्यपदार्थांची ओखळ करून देत असत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा केला होता. दरम्यान, शिरीश गवस यांचं आज सकाळच्या सुमासार अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.