तुंबण्यावर उतारा ‘होल्डिंग’चा

By Admin | Updated: August 5, 2016 02:07 IST2016-08-05T02:07:53+5:302016-08-05T02:07:53+5:30

मुसळधार पावसाने आणि त्याच वेळेस आलेल्या खाडीच्या भरतीमुळे शहरातील सुमारे २८ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

Extraction of Tuban 'Holding' | तुंबण्यावर उतारा ‘होल्डिंग’चा

तुंबण्यावर उतारा ‘होल्डिंग’चा


ठाणे : रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्याच वेळेस आलेल्या खाडीच्या भरतीमुळे शहरातील सुमारे २८ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, म्हणून पालिकेने आता खाडीकिनाऱ्याच्या महत्त्वाच्या स्पॉटवर होल्डिंग पॉण्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या होल्डिंग पॉण्डमध्ये शहरात झालेल्या पावसाचे पाणी जमा होणार आहे. ओहोटी आल्यानंतर हे साचलेले पाणी खाडीत सोडले जाणार आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटनांना आळा बसेल, असा दावा पालिकेने केला आहे.
रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे बिंग उघड केले असून घोडबंदरसह शहरातील अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना समोर आल्या. घोडबंदर भागात तर अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळे अनेक भागांत पाणी साचले होते. परंतु, एमएसआरडीसीच्या चुकीमुळेच हे पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला होता. एमएसआरडीसीने याचे खापर पालिकेवर फोडले होते. परंतु, आता यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा, म्हणून एमएसआरडीसीला समज देण्यात आली असली तरी यापुढेही जाऊन आता नेदरलॅण्डच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात अधिक पाणी साचणाऱ्या भागांचा सर्व्हे केला जाणार असून पाणी साचण्याची नेमकी कारणे काय आहेत, याचा मागोवा घेतला जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात साधारणपणे १० होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. दरम्यान, अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने राबवली असून त्यांनी डच अ‍ॅण्ड पॉण्ट मेथड म्हणजेच फ्लॅट गेटचा आधार घेत भरतीच्या वेळेस खाडीत शहरातील पाणी सोडणे रोखून धरले. हे प्लांट त्यांनी वाशी आणि सीबीडीमध्ये उभारले आहे. त्यामुळे या भागात सध्या पाणी तुंबण्याच्या घटनांना आळा बसला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून आता ठाणे महापालिकेनेदेखील अशा प्रकारे डच अ‍ॅण्ड पॉण्ट ही मेथड वापरून होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व्हे केला जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)
>ओहोटी सुरू झाल्यावर पाणी सोडणार
पावसाळ्यात जोरदार पाऊस असताना त्याच वेळेस भरतीला उधाण आले असेल तर भरतीचे पाणी हे शहरात शिरते, किंबहुना पावसाचे पाणी हे खाडीत जाण्याचा प्रयत्न करते. परंतु, पाण्याचा फ्लो अधिक असल्याने ते पाणी शहराच्या विविध भागांत साचले जाते.
त्यामुळे आता पाणी साचण्याच्या अशा ठिकाणांवर हे होल्डिंग पॉण्ट उभारले जाणार असून त्या ठिकाणी शहरातील येणारे पाणी साचवले जाणार आहे. त्यानंतर, खाडीचे उधाण कमी झाल्यानंतर किंबहुना ओहोटी सुरू झाल्यानंतर हे पाणी खाडीत सोडले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Web Title: Extraction of Tuban 'Holding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.