दूधसागरजवळ एक्स्प्रेसवर दगडफेक

By admin | Published: July 14, 2015 01:00 AM2015-07-14T01:00:00+5:302015-07-14T01:00:00+5:30

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित बोगीत घुसू न दिल्याच्या कारणावरून दूधसागर धबधबा येथे एका जमावाने दगडफेक करून बोगीच्या काचा फोडल्या.

Expressway near Dudhsagar | दूधसागरजवळ एक्स्प्रेसवर दगडफेक

दूधसागरजवळ एक्स्प्रेसवर दगडफेक

Next

मिरज : गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित बोगीत घुसू न दिल्याच्या कारणावरून दूधसागर धबधबा येथे एका जमावाने दगडफेक करून बोगीच्या काचा फोडल्या. त्यामुळे त्या बोगीतील संतप्त प्रवाशांनी मिरजेत एक्स्प्रेस रोखून गोंधळ घातल्याने एक्स्प्रेसला एक तास विलंब झाला.
धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना बेळगावकडे परत जाण्यासाठी निजामुद्दीन एक्स्प्रेस ही एकच रेल्वेगाडी असल्याने हजारो पर्यटक रुळाच्या दोन्ही बाजूस थांबले होते. गोव्यातून मिरजेकडे येणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस सायंकाळी कॅसलरॉक स्थानकाच्या अलीकडे दूधसागर धबधब्याजवळ थांबल्यानंतर रेल्वेत पर्यटकांचा हा लोंढा घुसला. त्यांना रोखण्यासाठी वातानुकूलित बोगीतील प्रवाशांनी दरवाजे बंद केले. दरवाजे उघडण्यासाठी जमावाने आरडाओरडा करीत पुढील बाजूच्या एसी टु-टायर बोगीवर तुफान दगडफेक केली. यात एसी बोगीच्या आठ खिडक्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाला नाही.
एसी बोगीच्या काचा फुटल्याने वातानुकूलन यंत्रणा बंद पडली. दगडफेकीच्या घटनेमुळे व वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी मिरजेत गाडी आल्यानंतर गोंधळ घातला. एकदा गाडीचा रेक तयार झाल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता या कारणास्तव त्यात बदल करण्याचा किंवा बोगीच्या अदलाबदलीचा अधिकार स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना नसल्याने मिरजेत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसी बोगीच्या फुटलेल्या काचांना चिकटपट्ट्या लावून तात्पुरती मलमपट्टी करीत वातानुकूलन यंत्रणा सुरू केली. त्यानंतर तब्बल एक तासाच्या विलंबानंतरनिजामुद्दीन एक्स्प्रेस मिरजेतून रवाना करण्यात आली. (वार्ताहर)

लोंढ्याजवळचे दूधसागर धबधबा हे केवळ रेल्वेने जाता येणारे पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात तेथे जाण्यासाठी बेळगावसह परिसरातील जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने तरुण मिळेल त्या एक्स्प्रेसचा मार्ग धरतात. मात्र, सायंकाळी परत येण्यासाठी निजामुद्दीन एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे असल्याने दररोज या रेल्वेगाडीत जमावाची घुसखोरी होते. त्यातूनच वारंवार रेल्वेवर दगडफेकीच्या घटना होतात. गर्दीत चेंगराचेंगरी होऊन रेल्वेखाली सापडून अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

Web Title: Expressway near Dudhsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.