नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीत मतदानासाठी EVMचाच वापर; द्यावी लागणार एकापेक्षा अधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:31 IST2025-11-05T12:30:41+5:302025-11-05T12:31:18+5:30

रंगणार ६,८५९ जागांसाठी मतयुद्ध; नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका असलेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू; मतदारयादीत नाव शोधण्यास विशेष वेबसाइट अन् ॲप; उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढविली, मतदानाला मोबाइल नेण्यास असणार बंदी

EVMs will be used for voting in municipal council and nagar panchayat elections; more than one vote will have to be cast | नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीत मतदानासाठी EVMचाच वापर; द्यावी लागणार एकापेक्षा अधिक मते

नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीत मतदानासाठी EVMचाच वापर; द्यावी लागणार एकापेक्षा अधिक मते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, एकूण ३,८२० प्रभागांतील ६,८५९ जागांसाठी मतयुद्ध रंगणार आहे. नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली असून, त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिट असतील.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धती असून, एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणत: एका मतदाराला तीन ते चार जागांसाठी मत द्यावे लागेल. 

एका नगरपरिषदेची एकूण सदस्यसंख्या कमीत कमी २० ते ७५ पर्यंत असते. नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली तरी नगरपंचायतीच्या मतदारालाही एक मत सदस्यपदासाठी तर दुसरे मत थेट अध्यक्षपदासाठी अशी दोन मते द्यावी लागतील. सर्व नगरपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या १७ जागा आहेत.

या निवडणुकांसाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८८ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तैनात असतील. ६६,७७५ इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळाबाबत निर्देश देण्यात आले.

आचारसंहिता लागू

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगर परिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगर परिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. शासनाला नगर परिषदा व नगरपंचातींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी नसेल.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांना उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्यास mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून अर्ज दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. अर्ज व शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करावी लागेल.

कोकण विभाग

पालघर : डहाणू, जव्हार, पालघर, वाडा (न.पं.) | रायगड : अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण (न.पं.) | रत्नागिरी : चिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर, रत्नागिरी | सिंधुदुर्ग : कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला | ठाणे : अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर

नाशिक विभाग

अहिल्यानगर : देवळाली-प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर | धुळे : दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.), शिरपूर-वरवाडे | जळगाव : जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुणी (न.पं.), वरणगाव, यावल | नंदुरबार : शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा | नाशिक : भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपुरी, ओझर, पिंपळगांव-बसवंत, त्र्यंबक

पुणे विभाग

कोल्हापूर : आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव | पुणे : आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.). मंचर (न.पं.). राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव-दाभाडे, वडगाव (न.पं.) | सांगली : आष्टा, आटपाडी (न.पं.). इस्लामपूर, जत, पलूस, शिराळा (न.पं.). तासगाव, विटा | सातारा : कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई | सोलापूर : अक्कलकोट, अकलूज, अनगर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला

छ. संभाजीनगर विभाग

बीड : अंबाजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी-वैजनाथ | छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर | धाराशिव : भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा | हिंगोली : वसमतनगर, हिंगोली, कळमनुरी | जालना : अंबड, भोकरदन, परतूर | लातूर : अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर (न.पं.), उदगीर | नांदेड : बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा | परभणी : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ

अमरावती  विभाग

अकोला : अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, हिवरखेड, मूर्तिजापूर, तेल्हारा | अमरावती : अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट, वरुड | बुलढाणा : बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेंगाव, सिंदखेडराजा | वाशिम : कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड, वाशिम | यवतमाळ : आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर-नबाबपूर, पांढरकवडा

नागपूर विभाग

भंडारा : पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर, भंडारा | चंद्रपूर : बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजुरा, वरोरा | गडचिरोली : आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली | गोंदिया : गोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.), तिरोडा | नागपूर : बहादुरा (न.पं.). बेसा पिपळा (न.पं.). भिवापूर (न.पं.). बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर-ब्रह्मणी, कामठी, कांद्री-कन्हान (न.पं.). काटोल, खापा, कोंढाळी (न.पं.). महादुला (न.पं.). मोहपा, मौदा (न.पं.). नरखेड, निलडोह (न.पं.). पारशिवणी (न.पं.). रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव- तरोडी (खु) पांढुर्णा (न.पं.). गोधणी रेल्वे (न.पं.). कन्हान-पिपरी, मोवाड, वाडी, येरखेडा (न.पं.) | वर्धा : आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे, वर्धा

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा काय?

या निवडणुकांतील थेट अध्यक्ष व सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा वाढविली आहे.

वर्ग                                   थेट अध्यक्ष    सदस्य 
‘अ’ वर्ग नगर परिषद    १५ लाख रुपये    ५ लाख रुपये
‘ब’ वर्ग नगर परिषद    ११ लाख २५ हजार रु.    ३ लाख ५० हजार रु.
‘क’ वर्ग नगर परिषद    ७ लाख ५० हजार    २ लाख ५० हजार रु.
नगरपंचायत     ६ लाख, सदस्य     २ लाख २५ हजार रु. 

जातवैधता प्रमाणपत्राचा पुरावा

राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु, जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागेल. उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.

मतदारांसाठी काय सुविधा?

नाव कसे शोधावे?

मतदारयादीतील नाव शोधण्यास mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करावा लागेल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रही शोधता येईल.

नवीन मोबाइल ॲप

नाव व मतदान केंद्र शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाइल ॲप आयोगाने विकसित केले आहे. मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती समजू शकते. ही माहितीसुद्धा या ॲपवर असेल.

केंद्रावरील सुविधा

  • मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदींना मतदानात प्राधान्य असेल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व व्हीलचेअरचीही व्यवस्था असेल. 
  • वीज, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था असेल. कुष्ठरोग्यांसाठी वेगळे वसतिगृह/आश्रम असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यास हरकत नसेल. तिथे उपलब्धतेनुसार डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. 
  • महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी महिला असतील, असे केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.

Web Title : महाराष्ट्र नगर पालिका चुनावों के लिए ईवीएम; मतदाताओं को कई मत डालने होंगे।

Web Summary : महाराष्ट्र नगर पालिका चुनाव ईवीएम से होंगे। बहु-सदस्यीय वार्ड और सीधे अध्यक्ष चुनाव के कारण मतदाताओं को कई वोट डालने होंगे। आदर्श आचार संहिता लागू; ऑनलाइन आवेदन उपलब्ध। मतदान केंद्रों पर सुविधाएं सुनिश्चित।

Web Title : EVMs for Maharashtra Municipal Elections; Voters to Cast Multiple Ballots.

Web Summary : Maharashtra municipal elections will use EVMs. Voters will cast multiple votes due to multi-member wards and direct president elections. Model code of conduct enforced; online application available. Facilities ensured at polling booths.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.