सांगलीकरांकडून दररोज होते रायगडावर शिवरायांची पूजा

By Admin | Updated: February 19, 2015 00:22 IST2015-02-19T00:11:18+5:302015-02-19T00:22:39+5:30

शिवप्रतिष्ठानचा उपक्रम : रायगड व्रताची २४ वर्षे जोपासना, स्वखर्चाने प्रवास, वर्षभराचे वेळापत्रक तयार

Every day Sangli used to worship Shivrajaya on Raigad | सांगलीकरांकडून दररोज होते रायगडावर शिवरायांची पूजा

सांगलीकरांकडून दररोज होते रायगडावर शिवरायांची पूजा

नरेंद्र रानडे -सांगली -रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पावसाची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. दर दोन दिवसांनी शहरातील दोन शिवभक्त स्वखर्चाने सांगली ते रायगड असा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून ‘रोप वे’चा उपयोग न करता पायी चालत गडावर जातात. या उपक्रमास शिवभक्त ‘रायगड व्रत’ असे म्हणतात. यामध्ये एका दिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणताही उपक्रम अव्याहत चालविणे ही अशक्य गोष्ट असल्याचा सर्वसाधारण समज आहे, परंतु सांगलीतील शिवभक्तांनी रायगड व्रताच्या माध्यमातून या संकल्पनेला छेद दिला आहे. १४ जानेवारी १९९१ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमास शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे यांनी प्रारंभ केला. प्रारंभापासूनच प्रत्येकाने स्वखर्चाने गडावर जायचे आणि पूजा करायची, हा दंडक शिवभक्तांनी जपला आहे. बहुतांशजण एसटी बसनेच प्रवास करतात. शिवभक्त सांगलीहून कऱ्हाड, तेथून महाडमार्गे रायगडावर पोहोचतात. तेथे गेल्यावर रात्री गडावरील धर्मशाळेत मुक्काम करतात. पहाटे उठून गडावरील छत्रपती शिवरायांची समाधी, महाराजांचे सिंहासन, होळीच्या माळावरील महाराजांची मूर्ती, जगदीश्वराचे मंदिर, शिरकाई देवीची मूर्ती आणि गडाच्या पायथ्याशी पाचड येथील जिजामाता समाधी या सहा ठिकाणी पूजा करण्यात येते. दुपारी शिवचरित्राचे वाचन करण्यात येते. रात्री पुन्हा गडावरच मुक्काम करून पहाटे पुन्हा सहा ठिकाणी पूजा करून दोघे शिवभक्त सांगलीकडे रवाना होतात. त्याच दिवशी दुपारी सांगलीहून दुसरे दोघेजण रायगडाकडे जाण्यासाठी निघतात.रायगडला जाऊन पुन्हा सांगलीत येईपर्यंत कोणीही हॉटेलमध्ये जेवण करीत नाही. जातानाच दोन दिवसांची शिदोरी बांधून नेण्यात येते. या उपक्रमात खंड पडू नये यासाठी वर्षाच्या प्रारंभीच १८३ दिवसांकरिता शहरातील ३६६ शिवभक्तांचे वेळापत्रक शिवप्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात येते. त्यामध्ये बदल होत नाही. काही अडचण निर्माण झाली, तर संबंधित शिवभक्तच दुसऱ्या दोघांची सोय करून देतात. प्रत्येक शिवभक्ताला सरासरी ८०० रुपये प्रवास खर्च येतो.
सांगलीहून रायगडावर जाऊन पूजा करण्यापेक्षा तेथे रोजच्याकरिता पगारी माणूस नेमण्याचा सल्ला काहींनी दिला होता, परंतु तो सल्ला सर्वच शिवभक्तांनी नाकारला. तेथे जाऊन पूजा केल्यानंतर वेगळीच अनुभूती येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला. भारतीय परंपरा, रुढी, सण यांचे रक्षण शिवरायांनी केले. त्यामुळे देवांचाही देव असलेल्या शिवरायांच्या समाधीची पूजा करणे हे कर्तव्यच असल्याची शिवभक्तांची भावना आहे. पावसाळ्यात दरडी कोसळणे, वेळेत बस न मिळणे अशा अडचणी येतात. असे असले तरीही रायगड व्रतामध्ये खंड पडत नाही.


रायगडावर असलेल्या सिंहासनावरील शिवरायांच्या पुतळ्यावर छत्र असावे, असा विचार पुढे आल्यावर दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे परवानगी मागण्यासाठी शिवभक्त गेले होते. त्यावेळी आबांनी तात्काळ परवानगी दिली आणि छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्याहस्ते हे छत्र बसविल्याची आठवण शिवभक्तांच्या मनात ताजी आहे.


तीस रुपयांत बारा हार
ज्यावेळी रायगड व्रतास प्रारंभ झाला, त्यावेळी सांगलीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच्या जाधव बंधूंनी गडावरील दोन दिवसांच्या पूजेसाठी बारा हार तीस रुपयांना दिले होते. त्यावेळेपासून आजअखेर त्यांनी हारांची रक्कम वाढविलेली नाही! आजही शहरातून जाणाऱ्या शिवभक्तांना जाधव बंधू तीस रुपयांमध्येच बारा हार देतात.

Web Title: Every day Sangli used to worship Shivrajaya on Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.