कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:02 IST2025-02-14T07:02:21+5:302025-02-14T07:02:36+5:30
महापालिकेत शिंदे यांच्या जवळील नोकरशहांच्या बदल्या सुरू झाल्याने ते अस्वस्थ असल्याचे शिंदेसेनेत बोलले जात आहे.

कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे
रातीची झोप मज येईना...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाशी संबंधित बोलावलेल्या बैठकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली. हे खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे राखले आहेत. भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नियुक्ती शिंदे यांनी केली. फडणवीस यांनी वैद्य यांना बदलून तेथे अनमोल सागर यांची नियुक्ती केली. उल्हासनगर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची बदली केली. यामुळे महापालिकेत शिंदे यांच्या जवळील नोकरशहांच्या बदल्या सुरू झाल्याने ते अस्वस्थ असल्याचे शिंदेसेनेत बोलले जात आहे.
सईसाठी ‘कांदेपोहे’ पुन्हा अनलकी!
सई ताम्हणकर आणि कांदेपोहे यांचे नाते फार जुने आहे. सईचा मुख्य भूमिकेतील ‘कांदेपोहे’ या पहिल्या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाल्याने त्याचे शीर्षक ‘सनई चौघडे’ करण्यात आले होते. दीप्ती श्रेयस तळपदे निर्मित या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे होता. सई आता बऱ्याच वर्षांनी कांदेपोहेचा उल्लेख असलेल्या भाडीपाच्या ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ या शोमध्ये दिसणार होती, पण रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यामुळे वातावरण तापल्याने हा भाग स्थगित करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा सईसाठी ‘कांदेपोहे’ अनलकी ठरल्याची कुजबुज आहे.
आमदार पक्षाचे की उरणचे?
सध्या उरण-पनवेल परिसरातील विविध समस्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. जेएनपीएतील वाढत्या अवजड वाहतुकीमुळे कुठे अपघात, कुठे वाहतूककोंडी तर कुठे भरावाने खाड्या प्रदूषित झाल्या आहेत. याबाबत मच्छीमारांसह स्थानिकांनी अनेक आंदोलने केली. तसेच विरार-अलिबाग काॅरिडॉरसह तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी एकवटले आहेत; परंतु, ज्यांनी हे प्रश्न धसास लावायला हवेत, ते आमदार महेश बालदी कुठेच फिरकलेले दिसले नाहीत. पक्षाचा एखाद-दुसरा कार्यक्रम वा जेएनपीएत येणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत यापलीकडे बालदी दिसेनासे झाल्यामुळे ते आमदार पक्षाचे आहेत की उरणचे, अशी चर्चा आहे.
राजकीय काडीमोड
बदलापूर शहरात आ. किसन कथोरे आणि शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. त्यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला आहे की, म्हात्रे यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेतून कथोरे यांचे नाव वगळण्यात आले. म्हात्रे यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेवर अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पण, कथोरे यांचे नाव नाही. साहजिकच कथोरे या लग्न सोहळ्यापासून काहीसे दूरच राहिले आहेत. त्यामुळे या विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिकेची चर्चा सुरू आहे. युतीच्या बोहल्यावर भाजप-शिंदेसेनेचा विवाह झाला आहे. परंतु, महायुतीच्या कथोरे आणि म्हात्रे यांच्यात राजकीय काडीमोडाची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी कुजबुज आहे.