युग हरवला, श्वास रोखला!

By Admin | Updated: September 3, 2014 01:37 IST2014-09-03T01:37:31+5:302014-09-03T01:37:31+5:30

त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट

Era lost, breath stopped! | युग हरवला, श्वास रोखला!

युग हरवला, श्वास रोखला!

युगच्या हत्येमुळे हादरले शहर : हळहळ, संताप अन् आक्रोश
नागपूर : त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट जवळ राहणाऱ्या व चांडक कुटुंबीयांच्या अगदी जवळ असणाऱ्या एका व्यापाऱ्याला अश्रू आवरत नव्हते. अशी केवळ एकच व्यक्ती नव्हती तर युगच्या घरासमोर जमलेल्या हजारो नागरिकांच्या मनात दाटली होती हळहळ, आक्रोश अन् संतापाची भावना. गुरुवंदना अपार्टमेंटमधील महिलांचे डोळे तर अश्रूंनी डबडबले होते.
पोलिसांवर रोष
रात्री १२.३० च्या सुमारास युगच्या घरासमोर उभ्या असलेल्या काही संतप्त नागरिकांनी लकडगंज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तर अनेक जण गणेशपेठ पोलीस ठाण्याकडे रोष व्यक्त करण्यासाठी गेले. मुळात युगला अपहरणकर्ते शहराबाहेर घेऊन गेलेच कसे, युगच्या अपहरणकर्त्यांना पकडण्यात अपयश का आले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते.
आईला सांगणार कसे?
युगची आईची प्रकृती अपहरणाच्या वृत्तापासूनच खालावली होती. गेल्या २८ तासांपासून स्वत:ला आणि कुटुंबीयांनाही सावरत असलेले डॉ. मुकेश चिमुकल्या युगच्या हत्येच्या वृत्ताने अक्षरश: कोलमडले. युगच्या आईला हत्येबद्दल मध्यरात्रीनंतर कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांना झोपण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. परंतु ते काम करत नसल्याने अखेर खासगी रुग्णालयात नेण्याचे नातेवाईकांनी ठरविले. यावेळी परिसरात उभ्या असलेल्या हजारोंच्या गर्दीने शांत रहावे व त्यांना कळू देऊ नका, असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले.
‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे
वाढली गर्दी
युगच्या हत्येची बातमी ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. छापरुनगर परिसरातील नागरिकांसोबतच महाल, इतवारी, वर्धमाननगर येथील अनेक नागरिकांनी गुरुवंदना अपार्टमेंट तसेच मेयो हॉस्पिटलकडे धाव घेतली. प्रत्येक जणाचे काळीज गहिवरले होते. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर क्षणाक्षणाच्या अपडेट्स लोक ‘शेअर’ करत होते आणि यामुळे निरनिराळ्या अफवा पसरत होत्या.
मेयोमध्ये तणाव अन् लाठीमार
मेयो हॉस्पिटलमध्ये युगचे शव आणणार असल्याची अफवा पसरली आणि मेयोसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली. सुमारे दीड हजार नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. गर्दी वाढल्याने मेयोसमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथेही पोलिसांचा बंदोबस्त असणे आवश्यक असताना पोलिसांची अनुपस्थिती होती. अखेर रात्री १ वाजताच्या सुमारास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला अन् गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
अवघे अपार्टमेंट जागे
युगच्या मृत्यूची बातमी येताच गुरुवंदना सहनिवास दु:खाच्या सागरात बुडून गेले. येथील महिला, लहान मुली, ज्येष्ठ नागरिक हताशपणे गॅलरीत उभे होते. रात्री उशिरापर्यंत येथील सर्व नागरिक जागेच होते आणि गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करीत होते.

Web Title: Era lost, breath stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.