शहापूरमध्येही सम-विषम पार्किंगचा तोडगा
By Admin | Updated: April 29, 2016 04:28 IST2016-04-29T04:28:38+5:302016-04-29T04:28:38+5:30
प्रायोगिक तत्वावर १ मे पासून शहरात सम - विषम पार्किंग व्यवस्थेसह अनेक प्रकारचे उपाय सुचवून मार्ग काढण्याचे निश्चित केले.

शहापूरमध्येही सम-विषम पार्किंगचा तोडगा
भातसानगर : शहरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी बोलावलेल्या शहापूर तहसील कार्यालयातील बैठकीत सर्वानुमते प्रायोगिक तत्वावर १ मे पासून शहरात सम - विषम पार्किंग व्यवस्थेसह अनेक प्रकारचे उपाय सुचवून मार्ग काढण्याचे निश्चित केले.
तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर नगराध्यक्ष योगिता धानके, पोलीस उपधीक्षक, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र तेलवणे, छोटी बाजार संघटनेचे अध्यक्ष गफार शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश धानके, बाजार समितीचे सभापती निलेश भांडे, नगरसेवक सागर सावंत, संजय सुरळके, सा. बां. विभागाचे अभियंता गोरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
दर दोन वर्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहापूर बाजारपेठेतील प्रमुख जिल्हा मार्गांच्या रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो ग्रामस्थांच्या व्यवसायावर हातोडा पडत आला आहे. परंतु, दरवेळेस कारवाई पूर्ण झाल्यावर या रस्त्याचे कोणतीही दुरु स्ती अथवा देखभाल ना ठेवल्याने पुन्हा त्याच वाहतूककोंडीला शहरवासियांना सामोरे जावे लागत असल्याचे छोटी बाजार संघटनेचे सल्लागार संजय सुरळके व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र तेलवणे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आमदार पांडुरंग बरोरा यांनी सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्तारु ंदीकरणानंतर पुढे जे काही करायचे आहे, त्याचा आराखडा तयार आहे का असे विचारले असता, तोदेखील नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर पोलीस प्रशासनाने बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून सम - विषम पार्किंगचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच शहापूर नगर पंचायत आणि वाहतूक पोलिसांचे पथक तयार करून बाजारपेठेत गर्दीच्या वेळेस दुकानदारांकडे माल उतरवण्यासाठी आलेले ट्रक तसेच रस्त्यावर व्यवसाय करणारे अनधिकृत फेरीवाले यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.