एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:47 IST2025-12-20T15:46:37+5:302025-12-20T15:47:04+5:30
Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी हे केवळ भारतात नाही, तर जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Deputy CM Eknath Shinde News: पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांबद्दल काहीही बोलून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून येतो. तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करता, ही कसली देशभक्ती, तुम्ही पंतप्रधान मोदींवर जेवढे आरोप कराल, तेवढी देशातील जनता त्यांच्यासोबत राहील, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
एपस्टीन फाईल्समध्ये जवळजवळ ३० वर्षांचा डेटा आहे. यात इ-मेल्स, पत्रे, फोटोग्राफ, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग यांसारखे प्रचंड मोठे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. एपस्टीन हा इस्त्रायलचा गुप्तहेर होता. अनेक अमेरिकेतील धनाढ्य त्याच्याकडे येत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टीनशी संपर्क २०१४ मध्ये आला होता. ट्रम्प यांचा सल्लागार मोदींची भेट हवी असल्याने एपस्टीनकडे गेला होता. त्या सल्लागाराशी मोदींचा काय संबंध होता, असा सवाल करत, एपस्टीनच्या ईमेलमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
मोदी केवळ भारतात नाही तर जगात लोकप्रियतेच्या शिखरावर
पंतप्रधान मोदी हे केवळ भारतात नाही, तर जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. एखाद्या लोकप्रिय व्यक्तीवर आरोप केले की त्याची गंभीर दखल घेतली जाते. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. म्हणून याची निंदा करावी तेवढी कमी आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हे लोक आपल्या लष्कराची बदनामी करतात. पाकिस्तानच म्हणणे खरे मानतात. एका तासात आपण हरलो होतो, असे म्हणण्यात त्यांना आनंद वाटतो. ही कसली देशभक्ती? हा देशद्रोह आहे. देशाशी बेईमानी आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, जेव्हा लोक दुर्लक्षित होतात. लोकांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यावेळी असे काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या, चर्चेमध्ये राहायचे, असा केविलवाणा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम सर्वश्रृत आहे. एनडीएचे घटक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आपला देश पुढे जात आहे. विकसित होत आहे. देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. ही जी काही पोटदुखी आहे, जळजळ आहे, ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते, असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.