राज्यात ३ जूनपासून पर्यावरण सप्ताह
By Admin | Updated: May 28, 2015 22:29 IST2015-05-28T22:29:57+5:302015-05-28T22:29:57+5:30
गोपीनाथ मुंडेंना अनोखी श्रद्धांजली : मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे आवाहन

राज्यात ३ जूनपासून पर्यावरण सप्ताह
सिंधुदुर्गनगरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास, जलसंधारण व बालविकास रोजगार हमी योजना विभागामार्फत जिल्हा प्रशासनास दिलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी देशासाठी व राज्याच्या विकासासाठी केलेली प्रभावी कामगिरी व योगदान विचारात घेता त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने २६ मे रोजी घेतला आहे.
या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. या पर्यावरण सप्ताहामध्ये जलयुक्त शिवार अभियानातील निवडण्यात आलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्राथमिक, माध्यमिक शाळेची ठिकाणे, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनी, शासकीय- निमशासकीय कार्यालय व रस्त्याच्या दुतर्फा आदी ठिकाणी प्राधान्याने घेण्यात यावा.
या कार्यक्रमासाठी पुणे सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी योग्य प्रतीच्या रोपांचा पुरवठा सर्व संबंधितांना करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपरोक्त पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावे. तसेच पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधींच्या हस्ते दरवर्षी ३ जून रोजी किमान एका गावामध्ये पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ करावा. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्व गावात पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्ष लागवड व इतर कार्यक्रम एकावेळी सुरू करावेत, एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमांतर्गत मजुरांना जॉबकार्ड देणे, विमा योजनेमध्ये समावेश करणे व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात यावीत. या पर्यावरण सप्ताहामध्ये सक्रीय लोकसहभाग घेण्यात यावा, तसेच वृक्ष लागवड करावयाचे गावनिहाय नियोजन करावे, प्रसिद्धीसाठी दिलेल्या जलयुक्त शिवार व रोजगार हमी योजना निधीतून पर्यावरण सप्ताहास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी. विभागीय आयुक्तांनी उपरोक्त पर्यावरण सप्ताहामध्ये हाती घेतलेल्या कार्यक्रमाचा अहवाल शासन निर्णयाच्या प्रपत्रात शासनास दरवर्षी २० जूनपर्यंत सादर करावा. पर्यावरण सप्ताह यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश ग्रामविकास व जलसंधारण महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)