गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:09 PM2020-07-17T15:09:30+5:302020-07-17T15:17:08+5:30

वटवृक्षाच्या जतनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र

environment minister aaditya thackeray writes to nitin gadkari to save 400 year old banyan tree | गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती

गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती

Next

सांगली: तब्बल ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे सरसावले आहेत. वटवृक्ष कापला जाऊ नये, यासाठी ठाकरेंनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ साठी वटवृक्ष तोडावा लागणार आहे. मात्र याला स्थानिकांकडून वाढता विरोध सुरू आहे. वटवृक्ष वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी चिपको आंदोलनदेखील सुरू केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी गडकरींना पत्र लिहून वटवृक्ष न कापता पर्यायी जागेवरून रस्त्याचं काम करण्याचं विनंती केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातो. गावातील गट क्रमांक ४३६ इथं यलम्मा देवीचं मंदिर असून त्यासमोर ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा असून तो वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षांसाठी नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे, असं आदित्य यांनी गडकरींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. वटवृक्षाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संबंधित जागेवरील महामार्गाचं संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचं जतन करण्याची विनंती आदित्य यांनी केली आहे.



पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी महामार्गाचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याबद्दल गडकरी यांचं कौतुकदेखील केलं आहे. या महामार्गाचा परिसरातल्या शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल. त्याबद्दल आपला आभारी असल्याचं ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे. आता या पत्राला गडकरींकडून नेमकं काय उत्तर मिळणार आणि वटवृक्षाचं जतन होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

चारशे वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी चिपको आंदोलन सुरू केलं आहे. आजपर्यंत या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यावरील अनेक झाडं तोडली गेली. त्याला कोणी विरोध केला नाही. मात्र ४०० वर्षांहून अधिक जुना वटवृक्ष असल्यानं त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवारानं वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली आहे. 

Read in English

Web Title: environment minister aaditya thackeray writes to nitin gadkari to save 400 year old banyan tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.