अभियांत्रिकी कॉलेज होणार ‘हाऊसफुल्ल’
By Admin | Updated: June 9, 2016 06:07 IST2016-06-09T06:07:41+5:302016-06-09T06:07:41+5:30
गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ संपली असे चित्र दिसून येत होते.

अभियांत्रिकी कॉलेज होणार ‘हाऊसफुल्ल’
मुंबई /नागपूर : गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ संपली असे चित्र दिसून येत होते. यंदा मात्र अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. ‘एमएचटी-सीईटी’मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. तर, दुसरीकडे गेल्या तीन वर्षांत पॉलिटेक्निकच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा तिपटीने फुगल्याची माहिती आहे.
अभियांत्रिकीमधील रिक्त जागा हे महाविद्यालयांसाठी चिंतेचे कारण झाले होते. परंतु यंदा मात्र स्थिती बदललेली दिसून येत आहे.अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘सीईटी’मध्ये पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कितीतरी अधिक संख्येने विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यातील काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यात प्रवेश घेतील. परंतु तरीदेखील उपलब्ध जागांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशेच्छुक राहणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेशाचा ‘कोटा’ पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावर्षी राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ६४ हजारहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा राज्यभरात अभियांत्रिकीच्या १ लाख ३८ हजार ७४१ जागा आहेत. ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या द्यिार्थ्यांची संख्या २ लाख ६२ हजार इतकी आहे. त्यामुळे निश्चितच महाविद्यालयांमधील प्रवेशसंख्या वाढीस लागणार आहे.
गेल्यावर्षी पॉलिटेक्निकच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या ८३ हजार ७८५ जागा रिक्त होत्या, त्यापैकी एक हजाराहून अधिक जागा या अनुदानित महाविद्यालयांतील आहेत. तर यंदा तब्बल ८ हजार १४२ जागा घटल्याचे प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, अभ्यासक्रम बंद पडला आणि विविध कारणांमुळे या जागा कमी झाल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
>पॉलिटेक्निकची आकडेवारी
2013-14
साली अभियांत्रिकी पदविकेच्या
२७ हजार ०९२ जागा रिक्त होत्या. तर २०१४-१५ साली रिक्त जागांची संख्या ७७ हजार २४७ वर पोहचला आहे. याउलट गेल्यावर्षी हाच आकडा ८३ हजार ७८५ इतका होता.