राष्ट्रगीताची समाप्ती अर्ध्यावरच!
By Admin | Updated: August 16, 2014 01:58 IST2014-08-16T01:58:58+5:302014-08-16T01:58:58+5:30
स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर वाशिम येथे जिल्हा सैनिक कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला

राष्ट्रगीताची समाप्ती अर्ध्यावरच!
नंदकिशोर नारे, वाशिम
स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर वाशिम येथे जिल्हा सैनिक कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. जनसामान्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये दस्तुरखुद्द जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीच राष्ट्रगीत विसरले. शेकडो वाशिमवासीयांच्या साक्षीने या कार्यक्रमात एवढा गोंधळ उडाला की, राष्ट्रगीत अर्ध्यावरच सोडावे लागले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका ते जिल्हा क्रीडा संकुल मैदानापर्यंत ‘माँ तुझे सलाम’ या ऋणानुबंध व जनजागरण रॅली गुरुवारी काढण्यात आली़ नगर परिषदेच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता झालेल्या रॅलीचा उद्घाटन सोहळा झाला़ कार्यक्रमात प्रारंभी अपर जिल्हाधिकारी एस. बी. राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर स्काऊट गाइडच्या बँड पथकाने राष्ट्रगीतास सुरुवात केली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव यांनी ध्वनिक्षेपक हातात घेऊन बँड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली; मात्र ते राष्ट्रगीताची केवळ सुरुवातच करू शकले. जन गण मन... या तीन शब्दांच्या पुढे त्यांची गाडीच सरकत नव्हती. यामुळे बँड पथकाचीही पंचाईत झाली. या प्रकारामुळे गोंधळलेल्या जाधव यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. ध्वनिक्षेपक व्यवस्थित पकडून त्यांनी पुन्हा राष्ट्रगीत सुरू केले; परंतु या वेळीही त्यांची गाडी काही केल्या ‘जन गण मन’ यापुढे सरकण्यास तयार नव्हती. जाधव यांच्या या विस्मरणाने बँडपथक गोंधळले. सैनिक कार्यालयातील कर्मचारी एस. व्ही. देशपांडे यांनी लगेच माइक हातात घेऊन झालेला गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही राष्ट्रगीत म्हणता आले नाही. राष्ट्रगीत म्हणताना तेही अडकल्याने गोंधळ आणखी वाढला. अखेर देशपांडे यांनाही राष्ट्रगीत येत नसल्याचे पाहून, राष्ट्रगिताची अर्ध्यावरच समाप्ती केली.