अभिव्यक्तीच्या अंताचा प्रवास...

By Admin | Updated: August 2, 2016 05:13 IST2016-08-02T05:13:23+5:302016-08-02T05:13:23+5:30

लेखक, नाटककार, कलाकार या सर्वांनी मिळून अभिव्यक्ती निर्माण केली, पण साहित्याच्या अंताच्या क्षणापाशी आपण येऊन ठेपलो आहोत.

The end of the expression ... | अभिव्यक्तीच्या अंताचा प्रवास...

अभिव्यक्तीच्या अंताचा प्रवास...


पुणे : लेखक, नाटककार, कलाकार या सर्वांनी मिळून अभिव्यक्ती निर्माण केली, पण साहित्याच्या अंताच्या क्षणापाशी आपण येऊन ठेपलो आहोत. साहित्य संहिता संपली आहे. पूर्वी शब्दांच्या स्पर्शाची भाषा होती, आता शब्द केवळ दृश्यात्मक उरले आहेत. लोकमान्यांनी अभिव्यक्तीच्या आरंभाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या अभिव्यक्तीच्या अंताकडे जात आहोत. शंभर वर्षांचा हा उलटा प्रवास आहे, असे मत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
एस. पी. कॉलेजमधील वादसभेचे उद्घाटन लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त झाले. या वेळी ‘अभिव्यक्ती:आरंभ आणि अंत’ या विषयावर डॉ. देवी बोलत होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, वादसभेचे प्रमुख प्रा. दीपक कर्वे या प्रसंगी उपस्थित होते.
आपण किती प्राचीन आहोत, यापेक्षा मागच्या पिढीतील मोठ्या लोकांनी जे तत्त्वज्ञान दिले, त्यावर देशाचे मोठेपण व शहाणपण सिद्ध होत असते. लेखक, नाटककार सर्वांनी मिळून अभिव्यक्ती निर्माण केली. सध्या अवतीभवती नवी सांकेतिक संवाद पद्धत आकार घेत आहे. यामुळे भाषा नाहिशी होण्याचा धोका आहे. असे झाल्यास बोलणारा माणूस फक्त संग्रहालयात पाहायला मिळेल. अभिव्यक्तीच्या अंताकडे आपण जात आहोत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
लोकमान्यांना स्वराज्य हे केवळ भौगोलिक राज्य अपेक्षित नव्हते. त्यांनी त्यापुढे जात अभिव्यक्तीचा शोध घेतला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांनी अभिव्यक्तीचा हक्क बजावला म्हणून त्यांना प्राणास मुकावे लागले. त्या अर्थाने हे तीन खून अभिव्यक्तीचे आहेत. जगात एकाच प्रकारची अर्थव्यवस्था आकार घेत असल्याने लोकशाही कुंठत आहे.
समंजस लोकशाहीसाठी अभिव्यक्ती आवश्यक असून, वादसभेतून अभिव्यक्ती टिकवता येते. एकापेक्षा अनेक मते असतात व ती ऐकून घेण्याची तयारी असणे हे अभिव्यक्ती असण्याचे लक्षण आहे. आपली सद्सद्विवेकबुद्धी सावरण्याचा ऐतिहासिक क्षण आला आहे, अशा शब्दांत डॉ. देवी यांनी अभिव्यक्तीचे महत्त्व पटवून दिले. (प्रतिनिधी)
>जगात एकाच प्रकारची अर्थव्यवस्था?
भाषेचा पूल माणसाने बांधला. या गंगेची तुलना केवळ आकाशगंगेशी होऊ शकते. या आकाशगंगेत आता व्यत्यय येत असून, येत्या २५ वर्षांत जगातील सहा हजारपैकी चार हजार भाषा लुप्त झालेल्या असतील, ज्या उरतील, त्या लुळ्या-पांगळ्या स्वरूपात असतील, असे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.
लोकमान्यांना स्वराज्य हे केवळ भौगोलिक राज्य अपेक्षित नव्हते. त्यांनी त्यापुढे जात अभिव्यक्तीचा शोध घेतला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांनी अभिव्यक्तीचा हक्क बजावला, म्हणून त्यांना प्राणास मुकावे लागले. त्या अर्थाने हे तीन खून अभिव्यक्तीचे आहेत. जगात एकाच प्रकारची अर्थव्यवस्था आकार घेत असल्याने लोकशाही कुंठत आहे.

Web Title: The end of the expression ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.