विश्वकोश होणार अद्ययावत

By Admin | Updated: March 2, 2016 00:51 IST2016-03-02T00:51:02+5:302016-03-02T00:51:02+5:30

विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्या असल्याने या नोंदींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश

Encyclopedia will be up-to-date | विश्वकोश होणार अद्ययावत

विश्वकोश होणार अद्ययावत

पुणे : विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्या असल्याने या नोंदींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञानमंडळे स्थापन केली जाणार आहेत.
सद्यस्थितीमध्ये मराठी विश्वकोशाच्या २३ खंडापैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता.
कोश अद्ययावत करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये ही ज्ञानमंडळे निर्माण करण्यात येणार आहेत.
विषयांच्या व्याप्तीनुसार विषय/उपविषयाला धरून एकूण ६० किंवा अधिक ज्ञानमंडळे कार्यरत रहाणार आहेत. एका ज्ञानमंडळामध्ये विषयाशी संबंधित ३ ते ५ तज्ज्ञ व एक समन्वयक यांचा समावेश असेल, अशी माहिती मराठी भाषा विभागाच्या उपसचिव अपर्णा गाडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विश्वकोश मंडळावरील सदस्यांवर पालक म्हणून विशिष्ठ विषयाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
तसेच संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक व संशोधन संस्था येथील मराठीतून संशोधनात्मक लेखन करण्याचा अनुभव असलेले विषयतज्ज्ञ, सेवानिवृत्त विषयतज्ज्ञ, संशोधक विद्यार्थी यांना समन्वयक म्हणून नेमले जाणार आहे. विश्वकोशातील नोंदी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेसाठी ४ कोटी ५२ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Encyclopedia will be up-to-date