एल्गार परिषद प्रकरण: शरद पवार यांना लवकरच समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 02:52 AM2020-02-26T02:52:11+5:302020-02-26T06:55:15+5:30

एप्रिलमध्ये साक्ष होण्याची शक्यता

Elgar case ncp chief Sharad Pawar will be get summons soon kkg | एल्गार परिषद प्रकरण: शरद पवार यांना लवकरच समन्स

एल्गार परिषद प्रकरण: शरद पवार यांना लवकरच समन्स

Next

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेतील वक्ते व कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी पूर्वग्रहदूषित कारवाई केल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्याबाबत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून लवकरच समन्स पाठविले जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साक्षीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण दंगलप्रकरणाची चौकशी निवृत्त न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून सुरू आहे. त्याची मुदत ८ एप्रिलपर्यंत असून त्यानंतर त्यांनी सरकारला अहवाल सादर करावयाचा आहे. शरद पवार यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे वर्ग केल्याने राज्य सरकार व केंद्रामध्ये वाद निर्माण झाले होते. त्यानंतर पवार यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार पुणे पोलिसांनी निरपराधांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप केला होता.

उजव्या विचारसरणीच्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्या चिथावणीमुळे दंगल घडल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे विवेक विचार मंच या सामाजिक गटाचे सदस्य सागर शिंदे यांनी पवार यांची साक्ष घेण्याबाबत आयोगासमोर अर्ज दाखल केला होता. न्या. पटेल यांनी तो मान्य केला. त्यात बाजू मांडत असलेल्या अ‍ॅड. आशिष सातपुते यांनी सांगितले की, आयोगाने त्यांना साक्षीस हजर राहण्यासाठी लवकरच समन्स पाठवण्याचे मान्य केले आहे. आयोगाची मुदत संपण्यापूर्वी त्यांना बोलावले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Elgar case ncp chief Sharad Pawar will be get summons soon kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.