अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरूच
By Admin | Updated: July 31, 2016 04:45 IST2016-07-31T04:45:12+5:302016-07-31T04:45:12+5:30
अकरावीचे वर्ग १ आॅगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटलेला नाही.

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरूच
मुंबई : अकरावीचे वर्ग १ आॅगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे आॅफलाइन प्रवेश मिळतील, या आशेवर काही पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व आॅनलाइन नोंदणी केलेली नाही, परंतु आॅनलाइन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता अखेरची संधी देण्यात आली असून, याबाबतची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांची शनिवारी दादर येथील छबिलदास शाळेत झुंबड उडाली होती.
आॅनलाइन प्रवेश अनिवार्य करण्यात आले असले, तरीदेखील आॅफलाइन पद्धतीने प्रवेश मिळवता येतील, या आशेवर असलेल्या अनेक पालकांनी विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी केलेली नाही. मात्र, आॅफलाइन पद्धतीने प्रवेश मिळणारच नाही, म्हटल्यावर पालकांनी आता मार्गदर्शन केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. १ आॅगस्टपासून कॉलेज सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून ३० आणि ३१ जुलै रोजी आॅनलाइन प्रवेशाची नोंदणी होणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत, शासनातर्फे १ आणि २ आॅगस्टला पुन्हा एकदा आॅनलाइन नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४ आॅगस्ट रोजी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी लावण्यात येणार आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरातील अनेक महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक असून, त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे मार्गदर्शन केंद्राकडून सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)
>दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना टोकन
मुंबई, ठाणे विभागात मार्गदर्शक केंद्र आहेत. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांची अधिक गर्दी दादर येथील छबिलदास शाळेत शनिवारी झाली होती. विरार, वसई, टिटवाळा, बदलापूर येथील विद्यार्थ्यांनीही दादर येथील केंद्रावर चौकशीसाठी गर्दी केली होती. शनिवारी या केंद्रात दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणीसाठी टोकन देण्यात आले.
मार्गदर्शन
पुस्तिकांची मागणी
आॅनलाइन नोंदणी मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे अर्ज व माहिती पुस्तिका देण्यात
आली आहे. मात्र, अनेकांनी ही पुस्तके घेतलेली नाहीत.
त्यामुळे मार्गदर्शक पुस्तिकांची मागणी वाढली आहे. या पुस्तिकेचा अभ्यास करूनच आॅनलाइन नोंदणी करा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्राने विद्यार्थ्यांना केले आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना केलेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रात दाखल होत चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही केंद्रात दाखल होण्याऐवजी स्थानिक परिसरातील केंद्रातच विद्यार्थ्यांनी यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे उघडण्यात आली आहेत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
विचारपूर्वक
महाविद्यालय निवडा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, म्हणून प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पालकांनी काळजीपूर्वक नोंदणी करावी. महाविद्यालयांचे पर्याय निवडताना विचार करावा, जेणेकरून प्रवेशासंबंधी आणखी मनस्ताप होणार नाही.
- बी. बी. चव्हाण,
शिक्षण उपसंचालक