गोपाल लाजूरकर, गडचिरोली
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील रानटी हत्तीच्या दुसऱ्या कळपापासून विभक्त झालेल्या दोन टस्कर(सुळे असलेले नर) हत्तींनी रविवार, २५ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चक्क गडचिरोली शहरात प्रवेश केला. एवढेच नव्हे तर सुरुवातीला अंतर्गत रस्त्यांवर, त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरून फेरफटका मारला. हत्ती पाहताच रात्री रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली.
छत्तीसगड राज्यातून ४ मे रोजी कुरखेडा- धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात दोन रानटी टस्कर हत्तींनी मुरूमगाव- मालेवाडा वनपरिक्षेत्राच्या जंगलात प्रवेश केला. सुरुवातीला कुरखेडा तालुक्याच्या वासी- सोनसरी जंगल रस्त्यावर हे हत्ती दिसून आले होते. त्यानंतर देलनवाडी वन परिक्षेत्रातून पोर्ला, गोगाव, साखरा, अमिर्झा, मुरमाडी, मौशिखांब, वडधा परिसरातून देसाईगंज तालुक्यात एन्ट्री केली होती. टस्कर हत्तींचा संचार वडसा वनविभागातच होता; परंतु शनिवार, २३ मे च्या रात्री हत्तींनी गडचिरोली वन विभागात प्रवेश केला. हे हत्ती एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास बोदली- माडेतुकूम, इंदिरानगरच्या जंगलातून थेट पोटेगाव मार्गाने शाहूनगरात प्रवेश केला. येथील अंतर्गत रस्त्यांसह मूल राष्ट्रीय महामार्गावरून फेरफटका मारला. त्यामुळे पहाटे फिरणाऱ्या नागरिकांची घाबरगुडी उडाली.
मानापूर गावातही केला होता प्रवेश
याच दोन रानटी हत्तींनी ११ मे रोजी सकाळी ६:३० वाजता आरमोरी तालुक्याच्या मानापूर गावात प्रवेश केला होता. दरम्यान, भीतीपोटी पळत सुटलेली एक महिला उंच जागेवरून खाली कोसळून जखमी झाली होती. वर्षभरापूर्वी छत्तीसगड राज्यातून आलेल्या एका टस्कर हत्तीने गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा गावात प्रवेश केला होता. त्यानंतर या हत्तीने गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथे एकाचा तर भामरागड तालुक्यातील दोन महिला व एका पुरुषाचा तसेच तेलंगणा राज्यातील दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता.
हत्ती का भरकटत आहेत?विशेषतः टस्कर हत्ती कळपातून का भरकटत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. हे हत्ती नवीन अधिवास शोधण्यासाठी मूळ कळपातून विलग होऊन नवीन वनक्षेत्र शोधतात. तशी कळपाची संमती असते. जिल्ह्यात सध्या वावरत असलेल्या ३२ हत्तींच्या कळपात हे दोन टस्कर हत्ती मिसळत नसल्याने हे हत्ती छत्तीसगड राज्यातून दुसरा कळप जिल्ह्यात घेऊन येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये अशाचप्रकारे कोरची तालुक्यात दोन टस्कर हत्ती येऊन गेले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये २३ हत्तींचा कळप आला व स्थिरावला. त्याची संख्या आता ३२ झाली आहे. छत्तीसगड राज्यातून पुन्हा दुसरा कळप हे टस्कर हत्ती घेऊन येण्याची शंका वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तशी चिन्हेही दिसत आहेत.