विद्युत रोषणाईनं एलिफंटा बेट आता लखलखणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:31 IST2018-01-25T15:31:09+5:302018-01-25T15:31:59+5:30
जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील 17 सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे 70 वर्षांत प्रथमच वीज पोहोचवण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे.

विद्युत रोषणाईनं एलिफंटा बेट आता लखलखणार
मुंबई- जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील 17 सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे 70 वर्षांत प्रथमच वीज पोहोचवण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे. महावितरणाने या बेटावर केलेल्या कामाची पाहणी आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एलिफंटा बेटावर जाऊन केली. या प्रसंगी त्यांच्यासोबत ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एलिफंटा लेणी आता विद्युत दिव्यांच्या प्रकाशाने लखलखणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या बेटावर वीज पोहोचवण्याचा निश्चय केला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या दिशेने यशस्वी प्रयत्न केल्यामुळे या बेटावर वीज नेणे शक्य झाले आहे. यामुळे घारापुरी बेटावरील 950 लोकांना वीज पुरवठा होणार असून, मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा विकास करता येणे शक्य होणार आहे.
राज्य शासनाने घारापुरी बेटाचा विकास करण्यासंबंधी जबाबदारी ही मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या संस्थेस सोपवली व त्यांच्यातर्फे महावितरण कंपनीस बेटावर पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठीचे अंदाजपत्रक देण्यासंबंधी कळवले.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाने एलिफंटा लेणी विद्युतीकरण करण्याकरिता समुद्र तळापासून मरीन केबल तसेच घारापुरी बेटावरील विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याचा रु. 21 कोटींचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठवण्यात आला होता, त्यापैकी 18.5 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली. विद्युतीकरणाच्या कामात प्रामुख्याने 22 केव्ही, सिंगल कोअर केबल(3+1 अतिरिक्त केबल) समुद्राखालून 7 किमी टाकण्याचे काम करण्यात आले व त्याची यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात आली. यासाठी प्लाउ तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात आला.