राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 06:07 IST2018-05-04T06:07:53+5:302018-05-04T06:07:53+5:30

राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे

Electricity connections to 8000 families in the state | राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

 मुंबई : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात ‘ग्राम स्वराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावांत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या २३ जिल्ह्यांतील १९२ गावांत वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यायची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे २०१८ लाच पूर्ण केले असून या १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे.
देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे. त्यात दुर्गम व संवेदनशील अशा गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड या मागास जिल्ह्यांतही वीजजोडणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प), प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) तसेच मुख्यालयातील कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीजजोडणी देण्याचे हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

 

Web Title: Electricity connections to 8000 families in the state