पाऊस, परीक्षा अन् सण पाहून निवडणुका!
By Admin | Updated: July 16, 2014 03:32 IST2014-07-16T03:32:17+5:302014-07-16T03:32:17+5:30
पाऊस, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सणवारांचा विचार करूनच आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात येतील

पाऊस, परीक्षा अन् सण पाहून निवडणुका!
मुंबई : पाऊस, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सणवारांचा विचार करूनच आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात येतील तसेच प्रचारसभांच्या थेट प्रक्षेपणाला पेड न्यूज मानण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र, योग्यवेळी तारखा जाहीर करू, असे सांगत निवडणुकांच्या तारखेबाबत उत्सुकता कायम ठेवली.
गेले दोन दिवस आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. विविध राजकीय पक्ष, प्रशासनिक अधिकारी, पोलीस आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणूक आयुक्तांनी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना संपत म्हणाले, परीक्षा, गणेशोत्सव-दिवाळी आदी सण आणि पावसाळ्याचा विचार करून महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंड राज्यातील निवडणुकीच्या तारखा ठरविण्यात येतील. मात्र वर्षाअखेरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, जुलै अखेरीस त्यासंबंधी सर्व तयारी करण्यात येईल, असे मुख्य आयुक्तांनी सांगितले. या वेळी निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा, नजिम झैदी उपस्थित होते.
थेट मतदारांपर्यंत आयोग पोहोचणार
लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान याद्यांतून वगळण्यात आलेल्या तब्बल २६ लाख मतदारांपर्यंत निवडणूक आयोग पोहोचणार आहे. या सर्वांना ‘स्पीड पोस्ट’द्वारे नावनोंदणी अर्ज पाठविण्यात येणार आहेत. आतापर्यंत १९ लाख नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. तर, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या १० दिवसांपर्यंत मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविता येणार आहेत, असे मुख्य आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)