शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:36 IST2022-09-06T14:32:14+5:302022-09-06T14:36:35+5:30
आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही.

शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका
कल्याण: खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय, त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे यांचाच दसरा मेळावा व्हायला पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही, असे ते म्हणाले.
आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष व एकनाथ शिंदेंचा गट भाजप सोबत आहे. मागच्या वेळेला भाजप आणि आरपीआय एकत्र असताना मुंबईत ८२ जागा निवडून आणल्या होत्या. यंदा ११४ जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नाही. राज ठाकरेंना घेतले तर भाजपचे नुकसान होऊ शकते, उत्तर भारतीय, गुजराती, दक्षिण भारतीय समाजाची मते मिळणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.