ShivSena: शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:10 IST2022-06-21T13:09:47+5:302022-06-21T13:10:09+5:30
छातीत दुखू लागल्याने अकोल्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना पहाटे सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ShivSena: शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते
मुंबई: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. मीडियामध्ये विविध आमदारांची नावेही येत आहेत.
नितीन देशमुख रुग्णालयात
सकाळपासून माध्यमांमध्ये येत असलेल्या शिवसेनेच्या आमदार यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचेही नाव होते. आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार, नितीन देशमुख यांना पहाटे गंभीरावस्थेत सूरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने रुग्णालयातील विशेष कक्ष क्रमांक 15 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या वॉर्डबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला
एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे ठाण्यातील अनेक कट्टर समर्थक आणि नगरसेवक हेदेखील नॉट रिचेबल असून सर्व नेते पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडीदेखील शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे.
'...तर सत्ता स्थापन करू'-चंद्रकांत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रकरणावर एक सूचक विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असे विचारण्यात आले असता चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच याचे भाजप स्वागत करेल, असं म्हटलं आहे. "आम्ही काही भजनी मंडळी नाही. आम्हीही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे असा काही प्रस्ताव आला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे अशापद्धतीचं कोणताही प्रस्ताव भाजपाकडे आला तर आम्ही नक्कीच त्याबाबत विचार करू", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.