"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:56 IST2022-06-28T19:55:31+5:302022-06-28T19:56:35+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे.

"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे आपल्यासोबत सेनेच्या 40 आमदारांसह सूमारे पन्नास आमदार घेऊन गेले आहेत. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. सोशल मीडियामधून कार्यकर्त्यांचा हा संताप दिसून येतोय. पण, एका बंडखोर आमदाराने स्वतःविरोधातच पोस्ट केल्याचे समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांमध्ये पालघरचे आमदार श्रीनिवास चिंतामन वनगादेखील आहेत. त्यांनी फेसबूकवरुन स्वतःविरोधात पोस्ट केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. "शिवसेना आणि कट्टर शिवसेनेच्या जीवावर निवडून यायचं आणि परत शिवसेनेशी बंड करायचं असा जनतेसोबत गद्दारी करणारा आमदार श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार...." अशी फेसबुक पोस्ट आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुकवरून करण्यात आली आहे.
कार्यकर्त्याने केली पोस्ट
त्यांच्याच अकाऊंटवरुन करण्यात आलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ही पोस्ट श्रीनिवास वानगा यांनी केली नसून, वनगा यांचे फेसबुक अकाऊंट हँडल करणाऱ्या कार्यकर्त्याने केल्याची माहिती आहे. त्यांचा फोटो लावून त्यावर गद्दार असे लिहिले आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे.