"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 18:33 IST2022-06-26T18:32:24+5:302022-06-26T18:33:08+5:30
Maharashtra Political Crisis:"हे आमदार राज्यात परत आल्यावर लोक त्यांना सडके टमाटे, अंडी फेकून हाणतील."

"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही"
Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मंत्री उदय सामंतदेखील शिंदे गटात सामील झाले. आता एकनाथ शिंदेंकडे जवळपास 50 आमदारांचे समर्थन आहे. पण, इकडे कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत.
हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh bangar) यांनी अतिशय खोचक शब्दात बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. 'बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, यांची पोरं मुंजे मरतील', असे खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केले आहे. तसेच, काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय, काही आमदार ईडीच्या भीतीने गेल्याचेही बांगर यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर संतोष बांगर गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांशी थेट संपर्क साधत आहेत. वसमत शहरात नागरिकांशी संवाद सधताना त्यांनी हे उद्गार काढले.
'शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर'
एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौफ्यस्फोट औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. पण, 100 कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले. माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बंडखोरांना केंद्राची सुरक्षा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, 15 बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. शनिवारी सकाळीच शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना 37 आमदारांच्या सहीचे पत्र पाठविले होते. यामध्ये आमच्या कुटुंबीयांचे संरक्षण काढून घेतल्याचा आरोप केला होता.