"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 21:10 IST2025-04-19T20:43:34+5:302025-04-19T21:10:01+5:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले.

"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
Eknath Shinde on Uddhav Thackeray and Raj Thackeray: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूंकप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याबाबत आजच्या दिवसभरात केलेली विधाने. एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा सुरु झालीय. यावर प्रतिक्रिया देताना मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी निमंत्रण दिले. राज ठाकरेंच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विविध राजकीय नेत्यांच्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे गावी आहेत. यावेळी पत्रकारांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला मागे सरकवत जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असं म्हटलं.
दरम्यान, गुरुवारीच राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. यादरम्यान महापालिका निवडणुकांसाठी एकत्र राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भेटीत महायुतीबद्दलची कुठलीही चर्चा नव्हती, ही केवळ सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी मनमोकळेपणाने उजाळा दिला, असे म्हटलं होतं.
काय म्हणाले राज ठाकरे?
"मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही," असे राज ठाकरे म्हणाले.
त्यानंतर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी "किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय," असे म्हटलं.