Eknath Shinde Balasaheb Thackeray Shiv Sena: पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते, पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसौनिकांना आमदार, खासदार, मंत्री केल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा हाच वारसा सध्या आपले नेते एकनाथ शिंदे चालवत आहेत. त्यामुळे तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत, असे मत शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी पैसेवाल्यांपेक्षा कर्तृत्ववान शिवसौनिकांचा सन्मान केला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्येही हाच न्याय निष्ठावंत शिवसौनिकांना मिळेल. आगामी निवडणुका लक्षात घेऊन इच्छुकांनी आपल्या पक्षाचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, "तीन वर्षांपूर्वी निष्क्रिय लोकांपासून पक्षाला आणि त्यामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाला न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोणताही वैयक्तिक विचार न करता बंड केले. या बंडामुळे पक्ष तर वाचलाच, पण जे निष्ठावंत शिवसैनिक आणि नेते होते, त्यांना एक प्रकारची उर्जा आणि ताकददेखील मिळाली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा आपल्याला प्रत्यय आला आहे. दोन्ही निवडणुकीत पैसा हा निष्कर्ष न ठेवता काम करणारा आणि पक्षाला वाहून घेतलेला शिवसैनिक आपल्याला आज सत्तेत बसलेला दिसतो आहे. आता हाच न्याय येणाऱ्या निवडणुकांमध्ये लावला जाणार आहे."
"मी स्वत: एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धती पाहिलेली आहे. तळागळातील शिवसौनिकांना आधी न्याय हा शिवसेनाप्रमुखांचा जो विचार होता, तोच विचार आज एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. लोकसभा, विधानसभा ही नेत्यांची निवडणूक असते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था या शिवसैनिकांच्या निवडणुका असणार आहेत. जो शिवसौनिक पक्षासाठी राबत असतो, त्याला नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीत काम करण्याची संधी या निवडणुकीतून मिळणार आहे. मात्र एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असू शकतात. अशावेळी मतभेद बाजूला ठेवून मनभेद न करता ज्याला पक्ष संधी देईल, त्याच्या पाठीशी उभे राहून शिवसेनेचा उमेदवार कसा विजयी होईल या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे," असेही अडसूळ यांनी सांगितले.