"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:05 IST2025-12-11T17:34:40+5:302025-12-11T18:05:18+5:30
नागपूर अधिवेशनात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून मुख्यमंत्री पदासाठी स्वाभिमान गमावलेल्यांनी बोलू नये, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Eknath Shinde On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'पांघरूण खाते' आणि भ्रष्टाचारावरून सणसणीत टीका करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी आपल्या निष्ठा आणि तत्त्वे बाजूला ठेवून तडजोड केली, अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
महायुतीतील मंत्र्यांवरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री कारवाई करत नसल्याने, उद्धव ठाकरे यांनी 'पांघरूण खाते' तयार करण्याचा उपहासात्मक सल्ला दिला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, "ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचे पायपुसणे करून घेतले आणि विरोधातील पक्षांसोबत हातमिळवणी केली, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर बोट ठेवण्याचा अधिकार नाही," अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
"त्याच मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बुके घेऊन का जाता? मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचे पायपुसणे करुन घेतले त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा अधिकार नाही. त्यांना लोकांना जागा दाखवली आहे. त्यामुळे प्रत्येकाने पांघरुण पाहूनच हातपाय पसरवले पाहिजेत," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"अमित शाह यांच्यावर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे. त्यांचा बॅलन्स गेलेला दिसत आहे आणि संबंध नसलेल्या गोष्टी ते बोलू लागले आहेत. दोन नंबरने त्यांना विधानसभा निवडणुकीत शेवटच्या नंबरवर बसवले आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत असं म्हणत होते. घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. त्यांच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना पचनी पडलं नाही. त्यातूनच ही पोटदुखी सुरु आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.