एकनाथ शिंदे-शिवसेना सत्तासंघर्ष सुरू असतानाच आनंद दिघेंच्या पुतण्याची फेसबुक पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:45 PM2022-06-27T12:45:22+5:302022-06-27T12:46:16+5:30
आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेही शिवसेनेत कार्यरत
Eknath Shinde Shivsena Revolt, Kedar Dighe: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष शमण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीयेत. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर शिंदे गट शिवसेनेशी बंडखोरी करत आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्याची खेळी शिवसेनेने खेळली का? अशी चर्चा होती. या चर्चांना खुद्द केदार दिघे यांनीच पूर्णविराम लावला आहे.
"मी केदार दिघे याद्वारे असे नमूद करतो की, समाज माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली जात आहे की माझी म्हणजे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण मी अत्यंत नम्रपणे, प्रामाणिकणे सांगू ईच्छितो की अश्या प्रकारची माझी वा कोणाचीच नियुक्ती अधिकृतपणे या क्षणापर्यंत माननीय शिवसेनापक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे अथवा मा.आदित्यजी ठाकरे अथवा शिवसेना पक्ष यांनी केलेली नाही. या द्वारे मी असे जाहीर करतो की शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षसाठी काम करीत आहे. कृपया कोणाचाही गैरसमज होऊ नये या साठी मी माझी बाजू इथे मांडत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र", अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
केदार दिघे यांची फेसबुक पोस्ट-
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा त्यांच्या गटातून केला जात आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांना शिवसैनिकांच्या टीकेचं लक्ष्य व्हावं लागत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी या बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ रॅली काढल्या जात आहेत. ठाणे हा शिंदे गटाचा बालेकिल्ला असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्याा नेतृत्वाखाली ठाण्यात शिंदे समर्थकांची मोठी गर्दी शनिवारी पाहायला मिळाली. तसेच, ठिकठिकाणी शिंदे गटातील आमदारांच्या समर्थनासाठी कार्यकर्ते हळूहळू पुढे येऊ लागल्याचे दिसत आहे.