एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांसह मंत्रालयात धमकीचा ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:09 IST2025-02-20T13:08:22+5:302025-02-20T13:09:02+5:30

ठाण्यातील एका तरूणाने व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंविरोधात विधाने केली होती. त्या तरूणालाही नंतर अटक केले तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचं समोर आले.

Eknath Shinde car will be blown up with a bomb; Threatening email to Mantralaya along with Mumbai Police | एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांसह मंत्रालयात धमकीचा ईमेल

एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांसह मंत्रालयात धमकीचा ईमेल

मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलिसांना आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या ईमेलमुळे पोलीस सतर्क झाले असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून टाकणार अशी धमकी ईमेलमध्ये देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस, जे.जे मार्ग पोलीस आणि मंत्रालय या तिन्ही ठिकाणी हे ईमेल आल्याची माहिती पुढे आली आहे. ईमेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवू असं म्हटलं आहे. हा गंभीर ईमेल असून पोलीस गांभीर्याने दखल घेत हा ईमेल कुणी पाठवला, त्याचा आयपी लोकेशन तपासले जात आहे. कुणीतरी जाणूनबुजून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतेय का हे तपासले जात आहे. 

याआधीही बऱ्याचदा धमकी देणारे ईमेल, फोन कॉल्स प्रकार घडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर कुणीतरी भीती निर्माण करण्यासाठी हे कॉल केल्याचं पुढे आले होते. ठाण्यातील एका तरूणाने व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंविरोधात विधाने केली होती. त्या तरूणालाही नंतर अटक केले तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचं समोर आले. त्यामुळे आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्यानं पोलीस याचा गांभीर्याने तपास करत आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन किंवा ईमेल येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेकदा कॉलवर कधी गेटवे ऑफ इंडिया तर कधी विमानतळ उडवण्याच्या धमक्या येत असतात. एवढेच नाही तर कधी कधी एखाद्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारे फोनही मुंबई पोलिसांकडे येतात. याआधीही अज्ञात कॉलरने मुंबई पोलिसांना अलर्ट करत ३५० किलो आरडीएक्स पाकिस्तानहून मुंबईत आले असून ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह इतर ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. पण, तेव्हाही तपासात काही सापडले नाही.
 

Web Title: Eknath Shinde car will be blown up with a bomb; Threatening email to Mantralaya along with Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.