रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी आमचा प्रयत्न: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:36 IST2021-08-29T18:34:56+5:302021-08-29T18:36:12+5:30
भिवंडी वाडा मनोर व अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी दरम्यानच्या राज्यमार्गाची दुरावस्था झाली असल्याने या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी तातडीने दौरा काढला होता.

रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी आमचा प्रयत्न: एकनाथ शिंदे
नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडी वाडा मनोर व अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी दरम्यानच्या राज्यमार्गाची दुरावस्था झाली असल्याने या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी तातडीने दौरा काढला होता . यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिवंडी तालुक्यातील राज्यमार्गांच्या दुरावस्थे बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांना रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत कल्पना दिली असल्याने नागरीकांच्या भावना जाणून घेत रस्त्याच्या पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . दरम्यान पालकमंत्री यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर काही ठिकाणी तातडीची डागडुजी सुरू करून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरावस्थेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
या रस्त्याची दुरावस्था सर्वांना दिसत असल्याने तातडीने येथील रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असून त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून हा रस्ता राज्य सरकार कडून केंद्र सरकार घेणार असल्याच्या मुद्द्यावर त्यास आमची हरकत नसून त्यासाठीच्या तांत्रिक बाजू तपासून कार्यवाही होईल असे स्पष्ट करीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी टोल नाका पेटवून देण्याच्या मुद्द्यास बगल देत ते काय बोलले हे मला माहित नसून परंतु येथील प्रवास सुखकर कसा होईल यास आमचे प्राधान्य असेल असे वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.