जळगाव: भुसावळ भाजपा अध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.भुसावळ भाजपा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज भाजपानं बाबा हरदास मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी भुसावळ शहरातला भाजपाचा एक गट अचानक बैठकस्थळी आला. भुसावळ शहराध्यक्ष निवडीत सुनील नेवे यांनी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना मनमानी केल्याचा आरोप या गटानं केला. त्यांनी व्यासपीठावर शाईफेकदेखील केली. यावेळी व्यासपीठावर गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.
भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 15:03 IST