विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मातेचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 14:05 IST2017-11-12T14:00:47+5:302017-11-12T14:05:20+5:30
विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या मातेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मातेचा बुडून मृत्यू
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या मातेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
तांदळी (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील राधाबाई पुंडलिक मेथे (वय ३६) या ऊसतोड कामगार असून, तुळजापूर तालुक्यातील तडवळा शिवारात विजयकुमार कुलकर्णी यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी आल्या होत्या. रविवारी सकाळी त्या त्यांचा १३ वर्षीय मुलगा बालाजी यास घेऊन शेतातील विहिरीजवळ धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बालाजी हा विहिरीच्या कडेला अंघोळ करीत होता. यावेळी तोल जावून बालाजी विहिरीत पडल्याने बुडू लागला. हे पाहून राधाबाई त्याला वाचविण्यासाठी विहिरीकडे गेल्या. त्यांनी मुलाला कसेबसे वाचविले, मात्र त्या स्वत: पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.
आई बुडत असल्याचे दिसताच पाण्याबाहेर आलेल्या बालाजी याने आरडाओरडा करून तेथील इतर मजूर व नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेवून महिलेला पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळास पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला असून, महिलेचे प्रेत शवविच्छेदनासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.