दुष्काळी प्रदेशात शैक्षणिक उपक्रम
By Admin | Updated: October 9, 2015 02:26 IST2015-10-09T02:26:28+5:302015-10-09T02:26:28+5:30
नैसर्गिक प्रकोपाशी झुंजणाऱ्या विदर्भ-मराठवाडा या दोन्ही प्रदेशांनी शिक्षणक्षेत्रात मात्र नवनव्या उपक्रमांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. उपक्रमशील शाळांबाबत शिक्षण विभागाने बुधवारी जाहीर

दुष्काळी प्रदेशात शैक्षणिक उपक्रम
- अविनाश साबापुरे, यवतमाळ
नैसर्गिक प्रकोपाशी झुंजणाऱ्या विदर्भ-मराठवाडा या दोन्ही प्रदेशांनी शिक्षणक्षेत्रात मात्र नवनव्या उपक्रमांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. उपक्रमशील शाळांबाबत शिक्षण विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या विभागांनी अव्वल स्थान पटकाविल्याचे स्पष्ट झाले.
‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा’च्या घोडदौडीसाठी नवनवे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शाळांची यादी शासनाने जाहीर केली आहे.संपूर्ण राज्यातून २८६२ उपक्रमशील शाळांची शासनाकडे नोंद झाली आहे. ही आकडेवारी जाहीर करताना शासनाने नांदेड, यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख केला आहे.
नांदेड जिल्हा राज्यात पहिल्या स्थानी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा आणि शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली होती. साधारण प्रत्येक केंद्रातून दोन शाळा किंवा जिल्ह्यातून एकंदर २०० शाळांची यादी शासनाकडे पाठवायची होती. परंतु पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आदी जिल्ह्यांतून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. २०० शाळांची यादी पाठवायची असताना या जिल्ह्यांपैकी काहींनी केवळ २४ तर काहींनी ३२ एवढ्याच उपक्रमशील शाळांची नावे शासनाकडे पाठविली आहेत. कोल्हापूरमधून तर केवळ ४ शाळांची नावे पाठविण्यात आली आहेत.
शिक्षकांचे राज्यस्तरावर प्रशिक्षण
पायाभूत चाचण्या घेऊन कमकुवत विद्यार्थी शोधण्यात आले आहेत. आता त्यांना प्रगत करण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांना विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. विद्या परिषदेतर्फे या उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.