‘लोक’मताचा कौल पर्यावरणपूरक मेट्रोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 02:30 IST2017-03-06T02:30:48+5:302017-03-06T02:30:48+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम पहिल्यापासूनच वादात गुरफटले आहे.

Eco-friendly metro | ‘लोक’मताचा कौल पर्यावरणपूरक मेट्रोला

‘लोक’मताचा कौल पर्यावरणपूरक मेट्रोला


-प्रचिता हरळय्या, अंकिता सणस, ऐश्वर्या गडकरी
मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम पहिल्यापासूनच वादात गुरफटले आहे. गिरगाव, काळबादेवी येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासह मेट्रोचे कारशेड नेमके कुठे? या प्रश्नांची सरबत्ती सातत्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर होत राहिली.
मात्र त्यानंतरही निर्माण झालेले सर्व अडथळे पार करत मेट्रो-३ मार्गी लावायची; असा चंग बांधलेल्या कॉर्पोरेशनकडून प्रकल्पबाधितांचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. आरे येथील मेट्रो कारशेडबाबत कॉर्पोरेशन ठाम आहे. मात्र दुसरीकडे मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल होणार आहे. परिणामी झाडांच्या कत्तलीहून कॉर्पोरेशन टीकेचे धनी होत असतानाच मुंबईकरही याप्रश्नी बोलते झाले आहेत. या विषयांवर ‘लोकमत’ने मुंबईकरांशी संवाद साधला. ‘लोक’मताने ‘पर्यावरणपूरक मेट्रो’ला पसंती दिली आहे. दरम्यान, मेट्रो-३ या भुयारी प्रकल्पामुळे भविष्यात मुंबईतील वाहतूकीची समस्या काही प्रमाणात का होईना कमी होईल. मुंंबईकरांचा विशेषत: प्रवाशांचा वेळ वाचेल आणि साहजिकच वाहतूक प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मेट्रो-३ कडे पाहिले जाईल. या कारणात्सव झाडांएवढीच मेट्रोही महत्त्वाची असल्याचे मुंबईकरांचे मत आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप करणार आहे.
मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.
मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होणार आहेत. कार्बनडाय आॅक्साइडसारख्या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल.
मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
मेट्रो इतकी गरजेची नाही जितके पशू-पक्षी गरजेचे आहेत. जर मेट्रोसाठी झाडे तोडली गेली तर सर्व पक्ष्यांचे काय होणार याचा विचार केला आहे का? झाडांवर असलेली पक्ष्यांची घरटी, त्यांचे राहण्याचे ठिकाणच बदलून जाईल. माझ्या मते जर मेट्रो किंवा झाडे यातील एकाला निवडायचे असेल तर मी झाडाला निवडेन.
- सौरभ पाटे, कांदिवली
मेट्रो आणि झाडे दोन्ही महत्त्वाचे आहे. पण मेट्रोसाठी झाडांचा बळी देणे हे चुकीचे आहे. झाडे निसर्गासाठी खूप महत्त्वाच्या स्थानी आहेत. मेट्रोऐवजी लोकलच्या संख्येत वाढ करायला हवी. जेणेकरून झाडे वाचतील. कारण मेट्रो सर्वांना परवडणारी नाही. सर्वसामान्यांची पहिली पसंत लोकलच आहे.
- पूजा शिंदे, कांदिवली
मेट्रो आणि झाडे या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी गरजेच्या आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी झाडे तोडण्याऐवजी दुसरा उपाय शोधायला हवा. झाडांवर अनेक पक्ष्यांचा निवारा असतो. झाडे तोडल्यावर ते पक्षी कुठे जाणार? एक गोष्ट मिळवण्यासाठी झाडांची कतल करणे हे बरोबर नाही. यासाठीच पहिले प्राधान्य झाडांना दिले पाहिजे.
- राहुल पाटील, वरळी
मेट्रो प्रकल्प जितका महत्त्वाचा आहे तितकीच झाडेही महत्त्वाची आहेत. झाडे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पाऊस झाडांवर अवलंबून असतो. सध्या आपल्याला पावसाची जास्त गरज आहे. जर मेट्रो आणि झाडे यामधून एकाला निवडाचे असेल तर झाडांची निवड करेन.
- विनिता प्रजापती, लोअर परळ
पर्यावरणात झाडे पहिल्या स्थानावर आहेत. मेट्रो उभारण्यासाठी झाडांचा बळी घेणे धोक्याचे ठरेल. अजून काही वर्षांनी आपल्यालासुद्धा परदेशातून पाणी मागवण्याची गरज भासणार आहे. यातच आपण अशा प्रकारे झाडे तोडली तर ते दिवस लवकरच येतील.
- प्रियांका कांबळे, महालक्ष्मी
मेट्रोची गरज आहे असे वाटत नाही. त्याऐवजी दुसरी सुविधा द्या. झाडे तोडून मेट्रो करणे उचित नाही. कारण झाडे पर्यावरणाला हातभार लावतात. परिणामी झाडांचा बळी देऊ नये. यावर दुसरा उपाय योजावा.
- रोशन परब, बोरीवली
मेट्रो आणि झाडांमध्ये मी झाडांची निवड करेन. कारण आजघडीला वनसंपदा नष्ट होत आहे. याची पर्यावरणाला झळ बसत आहे.
- मयूर गुगावले, कांदिवली
मेट्रो आणि झाडे आपआपल्या स्थानी आहेत. झाडे नसतील तर प्रदूषण वाढेल. म्हणून झाडे महत्त्वाची आहेत आणि मेट्रोही महत्त्वाची आहे. कारण लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. मेट्रो आली तर लोकलची गर्दी कमी होईल. मेट्रो प्रकल्पात झाडांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- मिलिंद म्हात्रे, अंधेरी
माझे पहिले प्राधान्य झाडांना असेल कारण सध्या तरी मेट्रोची गरज नाही आहे. झाड तोडून मेट्रो सुरू करणे चूक आहे. झाडे गरजेची आहेत. झाडे तोडली तर माणसे जगणार कशी? परिणामी मेट्रोसाठी झाडे तोडू नका.
- सीमा सणस, गँ्रट रोड
शहराचा विकास करणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर निसर्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारने झाडांचा विचार करणे गरजेचे आहे.
- विरेन कोंडे, गोरेगाव
मेट्रो आणि पर्यावरणापैकी मी पर्यावरणाला अधिक प्राधान्य देईन. मेट्रो आणि झाडांची बरोबरी करण्याची गरज नाही. दोन्ही आपआपल्या स्थानी महत्त्वाचे आहे. झाडे जगली तर पर्यावरण जगेल- सुरज सोनावणे, गोरेगावपर्यावरणामुळे माणसाला आॅक्सिजन मिळतो. विकासासाठी झाडांचा अथवा पर्यावरणाचा बळी देता कामा नये. मेट्रोपेक्षा झाडे महत्त्वाची आहे. - मनाली पाटील, अंधेरी
डिजिटल इंडियासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. जेणेकरून प्रवास सोपा होईल. पण झाडे तोडून इंडियाला डिजिटल करणे पूर्णपणे चुकीचे आहे. एक पाऊल प्रगतीकडे नेण्यासाठी आपण कोणाचा बळी नाही घेऊ शकत, मग ती झाडे असली तर काय झाले. पर्यावरणासाठी ते हानिकारक ठरेल.
- किरण ठोकळे, वरळी
मेट्रो आणि झाडे हे दोन्ही गरजेचे आहे. जेवढी झाडे मेट्रोसाठी तोडली जातील त्याच्या तिप्पट झाडे लावणे गरजेचे आहे.
- आकाश ठाकरे, बोरीवली

आरे कॉलनीमध्ये मेट्रोची काहीच गरज नसून त्या ठिकाणी बसच्या सेवा वाढवल्या पाहिजेत. तसेच लोकसंख्या कमी असल्याने मेट्रो स्टेशन तयार करून काहीच फायदा होणार नाही. जास्त करून स्थानिक रहिवासी बसनेच प्रवास करतात. म्हणूनच आरेमध्ये मेट्रोचा फायदा होण्याची शक्यता कमीच वाटते. यासाठी झाडांचा बळी देणे चुकीचे ठरेल.
- विशाल पांचाळ, गोरेगाव
करी रोड येथे मोनोचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथून गाडीने प्रवास करणे खूप त्रासदायक वाटते आणि आता झाडे तोडून मेट्रोचे काम चालणार असेल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. मुंबईत तशी फारशी झाडे पाहायला मिळत नाहीत आणि आता उरलेली झाडे तोडली जाणार असतील तर मेट्रो नकोच.
- प्रणय हराळे, वरळी
मेट्रो आणि झाडांमध्ये मी झाडांची निवड करेन. कारण झाडे आॅक्सिजन देतात आणि पर्यावरणाला हातभार लावतात. परिणामी झाडे तोडू नयेत तर ती आणखी लावली जावीत.
- मधुमती गडकरी, मालाड
आरे कॉलनी ही वृक्षसंपदेने नटलेली आहे. मुंबापुरीचा विचार करता येथे हे एकमेव क्षेत्र हिरवाईने नटलेले आहे. आरेतली वनसंपदेसाठी पर्यावरणवादी झटत आहेत.

Web Title: Eco-friendly metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.