पैसे कमावणे सोपे, ते वापरणे अवघड; आयकर विभागाच्या नोटिशीमुळे संजय शिरसाट चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 06:03 IST2025-07-11T06:03:00+5:302025-07-11T06:03:45+5:30
मंत्री शिरसाट यांना आयकरची नोटीस; उत्पन्नात तफावत

पैसे कमावणे सोपे, ते वापरणे अवघड; आयकर विभागाच्या नोटिशीमुळे संजय शिरसाट चिंतेत
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. शिरसाट यांनी या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आयकर विभागाकडे वेळ मागितल्याचे सांगितले.
आयसीएआयच्या एका कार्यक्रमात अतिथी म्हणून बोलताना शिंदे गटाचे मंत्री शिरसाट यांनी त्यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्याची कबुली दिली. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शिरसाट यांना आलेली नोटीस ही शिंदेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिरसाट चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल लिलावात त्यांच्या मुलाने सहभाग घेतला होता. यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या तक्रारीनंतर शिरसाट यांच्याकडे आयकर खात्याची वक्रदृष्टी वळल्याची चर्चा आहे.
पैसे कमावणे सोपे, ते वापरणे अवघड
वर्ष २०१९ मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, तर २०२४ साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असे आयकर विभागाने विचारल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले. याविषयी ९ जुलैपर्यंत खुलासा करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. नोटीसला उत्तर देण्यासाठी अवधी मागितला असल्याचे त्यांनी सांगितले. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र, ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं देखील त्यांनी नमूद केले.
वेदांत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : हॉटेल वेदांत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यापाठोपाठ आयकर खात्याची नोटीस शिरसाट यांना आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.