१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:42 IST2017-11-09T03:42:41+5:302017-11-09T03:42:52+5:30
देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.

१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी
मुंबई : देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. गडकरी म्हणाले की, एखादे वाहन टोल नाक्यावर आल्यानंतर त्यावर असलेले स्टिकर जे ई-पेमेंटशी जोडलेले असेल त्यावरून टोलची वसुली केली जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाऊ शकेल. यापुढे नवीन वाहनांवर असे नवे स्टिकर लावूनच ती बाजारात येतील. साडेसात लाख वाहनांना आतापर्यंत अशी स्टिकर्स पुरविण्यात आली आहेत. त्यांच्या खरेदीदाराच्या बँक खात्याशी ई-टोल संलग्न असेल. १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत त्यामुळे वाहनधारकांना ताटकळावे लागणार नाही. जुन्या वाहनांसाठीदेखील ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सहा महिन्यांत सुरू
मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाची जबाबदारी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उचलेल. या रेल्वेमार्गाची उभारणी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन करेल. आधी या मार्गासाठीच्या खर्चाचा भार महाराष्ट्र, मध्य प्रदेश सरकार व आपले मंत्रालय उचलणार होते. मात्र आता आपले मंत्रालय तो भार उचलेल, असे ते म्हणाले.
सांगली, नाशकात ड्रायपोर्ट
सिंदी (जि. वर्धा) आणि जालना येथे ड्रायपोर्ट उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सांगली आणि नाशिक येथे ड्रायपोर्टची उभारणी करून तेथून कृषी, औद्योगिक मालाची निर्यात केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सांगलीसाठी २ हजार एकर तर नाशिकसाठी ३०० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
वसईच्या खाडीतून माल थेट पोर्ट ट्रस्टमध्ये नेणार!
मुंबईला वसई-विरारहून ट्रक-कंटेनरने येणारा माल भिवंडीला नेला जातो. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी हा माल वसईच्या खाडीत धक्का निर्माण करून तेथे उतरवावा आणि तो समुद्रमार्गे थेट मुंबई पोर्ट ट्रस्टपर्यंत न्यावा, असा नवा उपाय नितीन गडकरी यांनी आज सुचविला. ते म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव मी कालच गोव्यात झालेल्या बैठकीत दिलेला आहे. वसई खाडीतील जागा त्यासाठी मिळाल्यास वाहतूक खर्च, प्रदूषण कमी होईल आणि वाहतूककोंडीही फुटेल.