ई प्रभाग कार्यालय आता रिजन्सी इस्टेटमध्ये

By Admin | Updated: August 2, 2016 04:00 IST2016-08-02T04:00:21+5:302016-08-02T04:00:21+5:30

२७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाच्या कार्यालयाचे लवकरच स्थलांतर होणार आहे.

The e-divisional office is now in Ridgeing Estate | ई प्रभाग कार्यालय आता रिजन्सी इस्टेटमध्ये

ई प्रभाग कार्यालय आता रिजन्सी इस्टेटमध्ये


कल्याण : २७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाच्या कार्यालयाचे लवकरच स्थलांतर होणार आहे. सद्य:स्थितीला डोंबिवलीमधील कै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या आवारात असलेले हे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी इस्टेटमधील महापालिकेच्या जागेत हलवण्यात येणार आहे. जागेअभावी होणाऱ्या गैरसोयीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
१ जून २०१५ ला २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यामुळे त्या गावांचा प्रशासकीय कारभार महापालिकेच्या माध्यमातून सुरू झाला. यासाठी ९ जून २०१५ रोजी ई प्रभागाची निर्मिती करण्यात आली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पडलेल्या प्रभाग रचनेत २७ गावांमधील १४ गावांचा समावेश ई प्रभागात झाला. यात एकूण १२ प्रभाग निर्माण झाले. सध्या ई प्रभागाचे कार्यालय डोंबिवलीतील महापालिकेच्या क्रीडासंकुलात आहे. परंतु, या ठिकाणची जागा अपुरी पडत असल्याने विद्युत, आपत्कालीन कक्ष, आरोग्य विभागाचा कारभार क्रीडासंकुलाच्या आवारातील ध्यानधारणा केंद्रातून चालवला जात आहे. त्यात नव्याने निवडून आलेल्या प्रभाग समिती अध्यक्षांनादेखील जागेअभावी कार्यालय उपलब्ध करून देता आलेले नाही. ही गैरसोय लक्षात घेता दावडी गावातील रिजन्सी इस्टेट परिसरातील महापालिकेच्या जागेत हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थलांतराची प्रक्रिया अंतिम स्वरूपात आली असून आॅगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ई प्रभाग कार्यालयाचे स्थलांतर होईल, अशी माहिती नव्याने पदभार स्वीकारलेले प्रभागक्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The e-divisional office is now in Ridgeing Estate