हुंडाबळींचे दुष्टचक्र
By Admin | Updated: September 17, 2014 00:59 IST2014-09-17T00:59:43+5:302014-09-17T00:59:43+5:30
हुंड्यापोटी लग्नात रक्कम मिळाली नाही, सोने किंवा महागड्या भेटवस्तू मिळाल्या नाही म्हणून पत्नीचा छळ करायचा. वैवाहिक जीवनाची गोडगुलाबी स्वप्ने रंगवून आपल्या (पतीच्या) भरोशावर माहेर सोडणाऱ्या पत्नीला

हुंडाबळींचे दुष्टचक्र
नरेश डोंगर - नागपूर
हुंड्यापोटी लग्नात रक्कम मिळाली नाही, सोने किंवा महागड्या भेटवस्तू मिळाल्या नाही म्हणून पत्नीचा छळ करायचा. वैवाहिक जीवनाची गोडगुलाबी स्वप्ने रंगवून आपल्या (पतीच्या) भरोशावर माहेर सोडणाऱ्या पत्नीला जगणे मुश्कील करायचे अन् एक दिवस तिला मृत्यूच्या जबड्यात ढकलायचे. केवळ हुंड्यासाठी!
ज्या कुप्रथेचे उच्चाटन झाले असा समज रूढ होऊ पाहात होता, त्याच हुंड्याच्या कुप्रथेने उपराजधानीत गेल्या सहा वर्षात ३४ विवाहित महिलांचे बळी घेतले. यातील आठ घटना यंदाच्या (गेल्या नऊ महिन्यातील) असून, त्यापैकी हुंडाबळीच्या दोन घटना अवघ्या पाच दिवसात घडल्या आहेत. हुंड्याचे भूत मानगुटीवर बसलेले उच्चशिक्षित तसेच सुखवस्तू कुटुंबातील तरुण आपल्या पत्नीचे बळी घेत आहेत. हे नराधम केवळ सुशिक्षितच नाही तर कायद्याचे जाणकारही आहेत, ही या प्रकरणातील सर्वात खेदजनक बाब आहे. १९८० मध्ये चंदा चोरडिया हुंडाबळी प्रकरण देशभर गाजले. यवतमाळ (नेर) जिल्ह्यातील चंदाचे लग्न १५ मे १९८० ला झाले. दोन्ही कुटुंब सुखवस्तू. मात्र, लग्नात चांदीचा ग्लास आणि वाटी दिली नाही म्हणून २० मे रोजी (लग्नाच्या अवघ्या पाचच दिवसानंतर) चंदाची तिच्या सासरी जाळून हत्या करण्यात आली. या घटनेने अवघा समाजच ढवळून निघाला. स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या सीमा साखरे यांनी नंतर हुंडाबळी विरोधात तीव्र आणि प्रभावी चळवळ राबवली. या चळवळीला समाजाची भक्कम साथ मिळाली अन् कायद्याचे पाठबळही मिळाले. हुंड्याच्या कुप्रथेविरुद्ध प्रदीर्घ जनजागरण झाले. हुंडाबळीच्या प्रकरणात गुंतलेल्यांना बहिष्कृतांसारखी वागणूक मिळत असल्यामुळे हुंड्याची कुप्रथा अनेक समाजातून हद्दपार झाली. त्यामुळेच हुंड्याचे भूत पळाल्याचा अनेकांचा समज झाला होता. मात्र, अलीकडे उघडकीस आलेल्या हुंडाबळीच्या घटनांमधून अवघा समाजच सुन्न झाला आहे. हुंड्याचे किडे अजूनही अनेकांच्या डोक्यात वळवळत आहेत. त्यामुळे अनेक लालची कुटुंबातील उच्चशिक्षितांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे वास्तव या आठवड्यातील तीन घटनांमधून उजेडात आले आहे.
सोनाली बोरकर
सोनाली अमोल बोरकर (वय २६, रा. क्वेटा कॉलनी, लकडगंज) १७ जून २०१४ ला अमोल पांडुरंग बोरकर (वय ३१) या वकिली व्यवसायात असलेल्या आरोपीसोबत सोनालीचे लग्न झाले. सासरच्यांकडून दोन लाखांचा हुंडा मिळावा म्हणून उच्चशिक्षित अमोल आणि त्याच्या नातेवाईकांनी सोनालीला ९ सप्टेंबरला लाकडी फळीने डोक्यावर मारले, नंतर तिला विष पाजले. १० सप्टेंबरला सोनालीचा मृत्यू झाला.
प्रिया मिश्रा
प्रिया सोनल मिश्रा (वय २९) रा. एमबी टाऊन मानकापूर, गिट्टीखदान हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. पती, सासू-सासरा, दीर आणि जाऊ यांच्याकडून हुंड्यासाठी सारखा तगादा. छळ असह्य झाल्यामुळे १४ सप्टेंबरच्या पहाटे गळफास लावून आत्महत्या. गिट्टीखदान पोलिसांकडून हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हे दाखल. विशेष म्हणजे, या घटनेतील मुख्य आरोपी प्रियाचा पती सोनल हा सुद्धा वकील आहे. तो एका कंपनीत विधी सल्लागार आहे. कायद्याचा मान कसा राखावा, असा सल्ला देणाऱ्या सोनलने हुंड्याच्या लोभापोटी आपल्या पत्नीचा बळी जाईल असे गुन्हेगारी कृत्य केले.
विद्या शिंदे
विद्या भरत शिंदे (वय २३) रा. यूओटीसीच्या क्षिप्रा बिल्डिंग, सुराबर्डीमध्ये राहत होती. तिचा पती आणि सासू विमलबाई साहेबराव शिंदे हे दोघे विद्याला क्रूर वागणूक देत होते. त्यामुळेच तिने १४ आॅगस्ट २०१३ ला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील विद्याचा आरोपी पती भरत हा पोलीस निरीक्षक आहे. अर्थात कायद्याची त्याला चांगली जाण आहे. त्यात त्याच्यावर अबलांच्या रक्षणाचीही जबाबदारी आहे. मात्र, कायदा आणि पतीचे कर्तव्य त्याने पायदळी तुडवून केवळ हुंड्यासाठी आपल्या पत्नीला मृत्यूच्या जबड्यात लोटले.