‘महाराष्ट्र दिन’सोबत साजरा होणार ‘दुर्ग दिन’
By Admin | Updated: April 29, 2017 02:56 IST2017-04-29T02:56:22+5:302017-04-29T02:56:22+5:30
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’सोबतच ‘दुर्ग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील १० प्रमुख किल्ल्यांची निवड

‘महाराष्ट्र दिन’सोबत साजरा होणार ‘दुर्ग दिन’
मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’सोबतच ‘दुर्ग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील १० प्रमुख किल्ल्यांची निवड केली असून, या ठिकाणी दुर्ग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी दुर्गप्रेमींना मिळणार आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिनानिमित्त क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी राज्याच्या गडकिल्ल्यांशिवाय दुसरी जागा असूच शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिन हा दुर्ग दिन म्हणूनही साजरा करण्याचा निर्धार सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे. दुर्ग दिनानिमित्त दुर्ग संवर्धनाची हाक दिली जाईल. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गड-किल्ल्यांवर प्रत्येक सण-उत्सव साजरा होत होता. त्याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी हा उत्सव साजरा केला जाईल. शिवाय भविष्यातही हा उत्सव साजरा करता यावा, म्हणून गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करणार आहे.
दुर्ग दिन साजरा करताना स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारी मावळ्यांना मानवंदना दिली जाईल. ३० एप्रिल रोजी रात्री सर्व सदस्य आणि दुर्गप्रेमी गडचढाई करतील. रात्री १२ वाजता किल्ल्यावरील दरवाजा, तटबंदी, बुरूज व मंदिर या ठिकाणी रांगोळी काढून आणि पणत्या लावून दीपोस्तव साजरा करतील. १ मे या दिवशी पहाटे उठून गडाची पूजा केली जाईल. त्यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन गडावरील स्वच्छता मोहिमेने उत्सवाची सांगता होईल. (प्रतिनिधी)