रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: May 30, 2014 02:14 IST2014-05-30T02:14:57+5:302014-05-30T02:14:57+5:30
लता मंगेशकर यांच्या पेडर रोड येथील ‘प्रभू कुंज’ या राहत्या घरासमोरील रस्ता गुरुवारी सकाळी अचानक खचला.

रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पेडर रोड येथील ‘प्रभू कुंज’ या राहत्या घरासमोरील रस्ता गुरुवारी सकाळी अचानक खचला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही़ मात्र, पेडर रोडवरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. याआधी सकाळी साडेआठच्या सुमारास केम्स कॉर्नरकडून कॅडबरी जंक्शनकडे जाणार्या पेडर रोडवरील रस्ता अचानक खचला. त्या वेळी पालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे केम्स कॉर्नरकडून महालक्ष्मी मंदिराकडे येणार्या वाहतुकीमधील एक लेन बंद झाली होती. परिणामी, या ठिकाणी तुरळक प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. दरम्यान, सकाळीच घटनास्थळी दाखल झालेल्या पालिकेने खड्डा बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित असलेल्या पालिका अधिकार्याने दिली. ...म्हणून रस्ता खचला! खचलेल्या रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याखालून पर्जन्यजलवाहिनी गेल्याचे लक्षात आले. या जलवाहिनीमधून होणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याखालील माती आणि दगड खिळखिळीत झाले होते. मुळात ब्रिटिशांनी बांधलेल्या या वाहिनीचे काम पावसाळ्यातील पाणी वाहून नेणे इतकेच आहे.इतर ऋतूंमध्ये ती कोरडी असायला हवी. मात्र, सध्या या वाहिनीला ठिकठिकाणी मलनि:सारण वाहिन्या जोडण्यात आलेल्या आहेत. परिणामी, पावसाळ्याआधी आणि पावसाळा संपल्यानंतर जलवाहिनी कोरडी राहण्याऐवजी त्यातील प्रवाह सुरूच असतो. वाहिनीवरील दगडांवर प्रवाहाचा मारा बसल्याने तिची झीज होते. परिणामी, रस्ता खचतो. हीच परिस्थिती येथील रस्ता खचण्यास कारणीभूत असल्याची शक्यता एका पालिका अधिकार्याने व्यक्त केली.