केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळी गावाच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: January 1, 2015 01:24 IST2015-01-01T01:24:49+5:302015-01-01T01:24:49+5:30
केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या

केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळी गावाच्या संख्येत वाढ
नागपूर विभाग : २७०० गावांची वाढ
नागपूर : केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या २०२९ होती आता ही संख्या ४८३२ झाली आहे.
नजरअंदाज पैसेवारीनुसार नागपूर विभागात एकूण २०२९ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा खाली होती. त्यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, भंडारा जिल्ह्यातील ७ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ गावांचा समावेश होता. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करू लागल्याने सरकारवर टीका होऊ लागली होती. राज्य सरकारने तत्काळ केंद्राकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात केंद्रीय पथकाने दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. नागपूर विभागातही या पथकाने पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती व त्याच वेळी राज्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत सरासरी ५७०० गावांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सरकारने सुधारित पैसेवारी काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यानुसार विभागातील दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी ही संख्या २०२९ होती व आता ती ४८३२ झाली आहे. दुष्काळी भागातील खरीपांच्या सर्वच गावांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे.
सुधारित अहवालानुसार नागपूर विभागात एकूण खरीप गावांची संख्या ७९४३ असून त्यापैकी ७७९६ गावांची पैसेवारी काढण्यात आली. त्यापैकी ४८३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी आहे, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
नागपूर जिल्ह्यात १२०० गावांची वाढ
नागपूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत तब्बल १२०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार जिल्ह्यात दुष्काळी गावांची संख्या ५९५ होती. आता सुधारित पैसेवारीनुसार ही संख्या १७९५ वर गेली आहे. सरासरी सर्वच खरीप गावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.