अभियंत्यासाठी ढोल-ताशाचा गजर
By Admin | Updated: August 5, 2016 00:41 IST2016-08-05T00:41:11+5:302016-08-05T00:41:11+5:30
कायमस्वरूपी अभियंता देत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका कार्यालयात ढोल-ताशा वाजवून आंदोलन करण्यात आले.

अभियंत्यासाठी ढोल-ताशाचा गजर
पुणे : कायमस्वरूपी अभियंता देत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका कार्यालयात ढोल-ताशा वाजवून आंदोलन करण्यात आले. आयुक्त कुणाल कुमार यांनी त्याची दखल घेत शिष्टमंडळाला बदली केलेले अभियंता हजर झाले नाहीत तर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
धायरी येथील मनसेचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे व युगंधरा चाकणकर यांनी सतत मागणी करूनही आमच्या प्रभागाला पालिका प्रशासन कनिष्ठ अभियंता देत नसल्याचे सांगितले. एका महिन्यात तीन अभियंते आले व ते रुजू होताच लगेचच त्यांची बदली करण्यात आली. प्रशासन विभागाचा कार्यभार असलेले मंगेश जोशी यांच्यामुळेच अभियंत्यांची सतत बदली होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे, नगरसेविका सुशीला नेटके, पुणे शहर सचिव महेश महाले व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आयुक्त कुमार यांच्या दालनात नंतर या सर्वांनी ठिय्या दिला. आयुक्तांनी तुमच्या प्रभागात अभियंत्याची नियुक्ती केली असल्याचे त्यांना सांगितले.
लायगुडे यांनी बदली झालेले अभियंते हजरच होत नाहीत, हजर झाले की लगेचच त्याची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात येते असे आयुक्तांना सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर विकासकामांवर मर्यादा येईल. त्यापूर्वीच कामांची अंदाजपत्रके तयार करणे, कार्यारंभ आदेश देणे ही कामे होणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी केला.