व्यसनमुक्तीचे ठराव झाले, अंमलबजावणीचे काय?
By Admin | Updated: August 17, 2016 23:14 IST2016-08-17T23:13:30+5:302016-08-17T23:14:10+5:30
तालुक्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त गावोगावी झालेल्या ग्रामसभांमध्ये व्यसनमुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील सुमारे ९० ग्रामपंचायतींमध्ये हा ठराव करण्यात आला.

व्यसनमुक्तीचे ठराव झाले, अंमलबजावणीचे काय?
ठराव झाले, अंमलबजावणीचे काय?
तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींचा व्यसनमुक्तीचा निर्धार : पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज
बारामती : तालुक्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त गावोगावी झालेल्या ग्रामसभांमध्ये व्यसनमुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील सुमारे ९० ग्रामपंचायतींमध्ये हा ठराव करण्यात आला. आता या ठरावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, तालुक्यातील अवैध दारूविक्रीची सद्य:स्थिती पाहता, हा ठराव कितपत यशस्वी ठरतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती तालुक्यात गावोगावी ग्रामसभा झाल्या. तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींपैकी ९० ग्रामपंचायतींत व्यसनमुक्तीचा ठराव झाला. यामध्ये सर्व प्रकारच्या व्यसनांच्या मुक्तीचा ठराव गावांमध्ये करण्यात आला आहे. हा ठराव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे जाणार आहे. तर, या ठरावानुसार गावोगावी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्यांची असेल. तालुका पोलीस ठाण्यामध्ये माळेगाव, सोनगाव आदी गावांचा ठराव सादर करण्यात आला आहे. मात्र, सध्या तालुका आणि शहरातील अवैध दारूविक्री, अवैध गुटखा विक्री, जुगार छुप्या पद्धतीने सुरू आहेत. तालुक्यातील कोणतेही असे गाव नाही, की ज्या ठिकाणी गुटखा किंवा अवैध दारू मिळणार नाही. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जरी व्यसनमुक्तीचा ठराव केला असला, तरी अवैध धंदे कितपत बंद होतील, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ज्या वेळी गावांमध्ये अशा प्रकारचे प्रकरण समोर येते, त्या वेळी संबंधांमुळे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही. पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात पुढाकार घेतल्यास पंचनामा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंचनाम्यासाठी कोणीही पंच म्हणून तसेच साक्षीदार समोर येत नाहीत.
तत्कालीन आघाडी सरकारने दिमाखामध्ये गुटखाबंदी केली; मात्र प्रत्यक्षात गुटखाबंदी कागदावरच आहे. आजदेखील गावोगावी छुप्या पद्धतीने चढ्या किमतीत गुटखाविक्री सुरू आहे. यामधून तरुण, तसेच किशोरवयीन मुलेदेखील व्यसनाधीन झाली आहेत. त्यातून लहान वयातच गंभीर आजारांचा सामना तरुण पिढीला करावा लागत आहे.
चौकट :
व्यसनमुक्तीसंदर्भात येणाऱ्या शासकीय योजना आणि ठरावांचे जागरूक नागरिक स्वागत करतात; परंतु त्याची अंमलबजावणी परिणामकारक होत नाही. त्यामुळे कागदावर प्रभावी दिसणाऱ्या या योजना प्रत्यक्षात अयशस्वी होताना दिसत आहेत. गुटखाबंदीने हे वास्तव अधोरेखित केले आहे.
आम्हाला माळेगाव, सोनगावसह दोन गावांचा व्यसनमुक्तीचा ठराव मिळाला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे आहे. पोलीसांना सहकार्य मिळाल्यास अंमलबजावणी करणे शक्य होईल. त्यासाठी पंचनामा करताना पंच व साक्षीदारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-चंद्रकांत कांबळे, पोलीस निरीक्षक
गावामध्ये अवैध दारूविक्री बंद आहे. अशा प्रकारचे धंदे आढळून आल्यास ग्रामपंचायत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेल. तसेच, ग्रामपंयातीची या प्रकारांवर करडी नजर राहील.
- गौरी काटे, सरपंच,काटेवाडी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्तीचा ठराव घेण्यात आला आहे. तालुक्यातील ९० ग्रामपंचातींनी आतापर्यंत ठराव पंचायत समितीकडे सादर केला आहे. गुरुवार (दि. १८) यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडे हे ठराव पाठवून देण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे गावांची नावे व ठराव पाठविण्यात येतील. -मिलिंद मोरे,
प्रभारी गटविकास अधिकारी,
ठराव संमत झाल्यानंतर गावामध्ये रिक्षाभोंगा लावून त्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. गावात अवैध दारूधंदे नाहीत. अवैध दारू धंदे आढळल्यास गांधीगिरी पद्धतीने अवैध धंदेचालकाला समज देण्यात येईल. त्यानंतरही हे प्रकार सुरूच राहिल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल.
- शिवाजी लकडे, सरपंच, ढेकळवाडीबारामती पंचायत समिती